मथुरेतील प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य (Aniruddhacharya) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कथावाचक अनिरुद्धाचार्य यांना यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी वृंदावन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून कथावाचक अनिरुद्धाचार्य यांना मिळालेल्या धमक्यांच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जात असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी एका अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र दिल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तुमचा आश्रम उडवण्यासाठी आम्ही वृंदावनात आलो आहोत, अशी धमकी पत्राद्वारे दिली आहे. याशिवाय, कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आठवडाभरात एक कोटी रुपये न दिल्यास आश्रम उडवून देऊ. शस्त्रधारी लोक तुमच्यावर नजर ठेवून आहेत, असेही धमकीच्या पत्रात लिहिले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कथावाचक अनिरुद्धाचार्य सध्या मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये कथा कथन करत आहेत. मात्र, मथुरा पोलिसांनी कथित धमकीच्या पत्राच्या आधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. याआधीही अनिरुद्धाचार्य यांना धमक्या आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कथावाचक अनिरुद्धाचार्य हे फार प्रसिद्ध आहेत. त्यांना बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांचे निकटवर्तीय मानले जाते. कथावाचक अनिरुद्धाचार्य यांची कथा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात.