मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातून एक अत्यंत हैराण करणारी आणि अमानुष घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या पतीने दुसऱ्या एका तरुणाशी बोलल्याच्या क्षुल्लक कारणावरून पत्नीचे नाक ब्लेडने कापून टाकले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे कृत्य केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पळून गेला नाही, तर त्याने स्वत:च जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल केले. संपूर्ण घटना झाबुआ जिल्ह्यातील रानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडलाव गावात घडली.
नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पती-पत्नी दोघेही मजुरी करून आपल्या घरी परतत होते. याच दरम्यान, पत्नी रस्त्यात एका दुसऱ्या तरुणाशी बोलू लागली. इतक्या साध्या गोष्टीवरून पतीला भयंकर राग आला. संतप्त पतीने त्याच क्षणी सर्वांना बोलावून घेऊन पत्नीला घटस्फोट देण्याविषयी बोलण्यास सुरुवात केली.
यावरून दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर अचानक ब्लेडने तिचे नाक कापले. नाकाचा पुढचा भाग कापला गेल्याने पत्नी वेदनेने जोरजोरात ओरडू लागली.
दारूच्या नशेत होता आरोपी
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी पती राकेश याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. दोघेही गुजरातच्या संतरामपूर येथे मजुरीचे काम करत होते आणि एक दिवस आधीच ते आपल्या घरी पाडलाव येथे परतले होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास राकेशने दारू प्यायली होती. दारूच्या नशेत आणि पत्नी दुसऱ्या तरुणाशी बोलल्याच्या रागातून त्याने हे अमानुष कृत्य केले.
उपचारासाठी स्वतःच नेले रुग्णालयात
पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी पती राकेशने तिला रानापूर येथील आरोग्य केंद्रात नेले. मात्र, नाकाचा पुढील भाग कापला गेल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. डॉक्टरांनी महिलेची गंभीर अवस्था पाहता तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात रेफर केले. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तातडीने गुन्हा दाखल करून आरोपी पती राकेशला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याची रवानगी थेट जेलमध्ये करण्यात आली आहे.