कोल्लम - केरळमध्ये एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या महिलेने तिच्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या करून त्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृत मुलीच्या आईने कुंदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मृत महिलेच्या पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. विपंजिका मणी असं मृत महिलेचे नाव असून तिची लहान मुलगी वैभवीची हत्या करून विपंजिकाने स्वत:चे आयुष्य संपवले आहे. सदर प्रकरणी विपंजिकाचा पती निधीश, नणंद नीथू आणि सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, विपंजिकाला लग्नात कमी हुंडा दिल्याने तिच्या सासरच्यांनी तिला मानसिक, शारीरिक त्रास देणे सुरू केले होते. तिचे सौंदर्य कमी व्हावे यासाठी सासरच्यांनी तिचे केसही कापले. कारण विपंजिका रंगाने गोरी होती आणि तिच्या घरातले सावळ्या रंगाचे होते. विपंजिकाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. पतीच्या विवाहबाह्य संबंधांवर तिने प्रश्नचिन्ह उभे केले त्यावरून तिला मारहाण करण्यात आली होती असा आरोप विपंजिकाच्या आईने केला आहे.
या प्रकरणी बीएनएस कलम ८५, १०८ आणि हुंडा विरोधी अधिनियम १९६१ च्या कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपंजिका कोणत्या मानसिकतेत आहे याची कल्पना नव्हती. यातील दोषी आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी. माझ्या मुलीला तेव्हाच शांतता मिळेल असं मृत विपंजिकाची आई शैलजा यांनी म्हटलं. कोल्लमला राहणाऱ्या विपंजिकाने मृत्यूपूर्वी तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक सुसाईड नोट पोस्ट केली होती.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होते?
विपंजिकाने तिच्या हस्ताक्षरात लिहिलेले सुसाईड नोट पोस्ट केले. त्यात म्हटलं होते की, माझ्या सासऱ्यांनी माझ्यासोबत आक्षेपार्ह वर्तवणूक केली, ही बाब पतीला सांगितली तेव्हा त्याने काहीच केले नाही. त्याने मी माझ्या वडिलांच्या सांगण्यावरूनच तुझ्याशी लग्न केले असं म्हटले. तो काही व्हिडिओ पाहायचा आणि बेडवर मलाही तोच व्हिडिओ दाखवायचा. त्याने माझा छळ केला. मला बऱ्याचदा मारहाणही केली. मी आता हे सहन करू शकत नाही. या लोकांना सोडू नका असं लिहिले होते.