लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी कक्षाने सराईत गुन्हेगार अहमद मोहम्मद शफी शेख ऊर्फ अकबर खाऊ याला ओडिसातून अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे एमडी जप्त केले.
घाटकोपर युनिटच्या अमलीपदार्थविरोधी कक्षाने दाखल केलेल्या गुन्ह्यात ६४ ग्रॅम एमडी हा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला होता. याप्रकरणात आधीच एक आरोपी फरीद रहेमतुल्ला शेख ऊर्फ फरीद चुहा याला अटक झाली होती.
तपासादरम्यान त्याचा साथीदार अकबर खाऊ हा अमलीपदार्थ पुरवणारा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा आरोपी ठाणे जिल्ह्यातील मोक्का कायद्यातील गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यावर पुन्हा ड्रग्स विक्रीच्या व्यवसायात सक्रिय झाला होता.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तो राजगंगपूर, जिल्हा सुंदरगढ, ओडिसा येथे लपल्याचे समजले. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने तातडीने ओडिसाला रवाना होऊन शोधमोहीम राबवली.
उद्यापर्यंत सुनावली पोलिस कोठडी
‘अकबर खाऊ’ला मुंबईतील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १२ लाखांचा एमडी जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास घाटकोपर अमलीपदार्थविरोधी कक्ष करत आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
अकबर खाऊ याच्यावर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरी, मारहाण तसेच एनडीपीएस कायदा व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. कुर्ला पोलिस ठाणे, व्ही. बी. नगर पोलिस ठाणे आणि अमलीपदार्थविरोधी कक्ष या ठिकाणी मिळून १८हून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची नोंद आहे.
१ नोव्हेंबर २०२५ रोजी रब्बानी चौक परिसरातून अकबर खाऊला अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड मिळवून आरोपीला मुंबईत आणले.
Web Summary : Mumbai police arrested Akbar Khau in Odisha, seizing MD worth ₹12.8 lakh. He faces multiple charges, including drug trafficking and organized crime. He was previously out on bail.
Web Summary : मुंबई पुलिस ने ओडिशा में अकबर खाऊ को गिरफ्तार किया, ₹12.8 लाख का एमडी जब्त किया। उस पर ड्रग तस्करी और संगठित अपराध सहित कई आरोप हैं। वह पहले जमानत पर बाहर था।