मीरा रोड : विमान कंपनीतील एका क्रू मेंबरने मीरा रोड येथील स्वतःच्या घरात सहकारी हवाई सुंदरीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नवघर पोलिसांनी दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
मीरा रोडमध्ये राहणारी २३ वर्षीय तरुणी एका एयरलाइन्समध्ये हवाई सुंदरी म्हणून काम करते. त्याच एयरलाइन्समध्ये देवाशिष शर्मा (२५) हा मूळचा राजस्थानच्या जयपूर येथील तरुण क्रू मेम्बर म्हणून कामास आहे. शर्मा हा मीरा रोड येथेच रामदेव पार्कच्या पंचमरत्न परिसरात भाड्याने राहतो. २९ जून रोजी रात्री लंडन ते मुंबई या विमानात काम करून दोघे सोबत मुंबईत आले. लंडनच्या मैत्रिणीसह तिघांनी मिळून मुंबईत पार्टी केली. उशीर झाल्याने तरुणीला शर्मा याने स्वतःच्या मीरा रोड येथील घरी आणले. ३० जूनच्या पहाटे शर्मा याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले.
तरुणाने यापूर्वीही दिला होता शारीरिक त्रासशर्मा याने आधीदेखील शारीरिक त्रास दिल्याबद्दल पीडित तरुणीने विमान कंपनीला ई-मेल करून तक्रार केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
विमानतळावरच ताब्यातया घटनेनंतर शर्मा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने हाँगकाँग येथील विमान कंपनीत नोकरी मिळवली होती. याप्रकरणी १८ जुलैच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास गुन्हा दाखल केल्यानंतर नवघर पोलिसांनी तत्काळ सहार विमानतळ पोलिसांशी संपर्क साधून १९ जुलैच्या मध्यरात्री शर्मा याला विमानतळावरच ताब्यात घेतले.