दिल्लीतील अलीपूर भागात वर्षभरापूर्वी प्रीतम प्रकाश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी सोनिया आणि तिचा प्रियकर रोहित (२८) यांनी प्रीतम प्रकाशची हत्या करण्याचा कट रचला होता. दोन्ही आरोपींना पोलिसांनी १ ऑगस्ट रोजी अटक केली आहे.
५ जुलै २०२४ रोजी प्रीतम प्रकाशची हत्या करून त्याचा मृतदेह हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील अग्वापूर गावाजवळील नाल्यात फेकून देण्यात आला. १५ दिवसांनंतर त्याची पत्नी सोनिया (३४) हिने अलीपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सोनिया आणि प्रीतमचं लग्न ती फक्त १६ वर्षांची असताना झालं होतं. लव्ह मॅरेज झालं होतं पण वैवाहिक जीवनात खूप तणाव होता.
प्रीतमला ड्रग्जचं व्यसन होतं आणि तो अनेकदा सोनियाला मारहाण करायचा. बेकायदेशीर शस्त्रे बाळगणं, चोरी, अपहरण अशा प्रकरणांमध्ये तो अनेकदा तुरुंगात गेला होता. २०२३-२४ मध्ये सोनियाची सोशल मीडियावर रोहितशी ओळख झाली, जो दिल्लीत टॅक्सी चालवायचा. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि या काळात हत्येचा कट रचण्यात आला.
२ जुलै २०२४ रोजी प्रीतमशी भांडण झाल्यानंतर सोनिया रोहितच्या टॅक्सीने सोनीपतमधील गणौर येथील तिच्या बहिणीच्या घरी गेली. याच दरम्यान सोनिया रोहितशी हत्येबद्दल बोलली पण त्याने ६ लाखांच्या मागणीवर हा विचार पुढे ढकलला. ३ दिवसांनंतर प्रीतम तिला घेण्यासाठी गणौरला पोहोचला, जिथे दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं आणि सोनियाने अपमानित होऊन मारण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा प्रीतमला एका प्रकरणात फरार घोषित करण्यात आलं तेव्हा तपासादरम्यान त्याचा मोबाईल ट्रॅक करण्यात आला जो सोनीपतच्या जाजी गावात एक्टिव्ह होता. छापा टाकताना प्रीतमच्या जागी रोहित सापडला ज्याच्याकडे तोच मोबाईल होता. चौकशीदरम्यान रोहितने सांगितलं की, तो सोनियाचा बॉयफ्रेंड आहे आणि हत्येनंतर त्याने मोबाईल तोडून टाकण्यासाठी घेतला होता. याप्रकरणी सोनियाला आता अटक करण्यात आली आहे.