ठाणे : पाच वर्षांपूर्वी सुपारी घेऊन केलेल्या खुनामध्ये पैसे न मिळाल्यामुळे डिवचणारा मित्र रूपेश जनार्दन पवार (३४, रा. बदलापूर, पश्चिम) याचा खून करून पसार झालेल्या अभिजित जाधव (२९, रा. बदलापूर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने शुक्रवारी अंबरनाथ येथून अटक केली आहे. अभिजित याने २०१५ मध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा सुपारी घेऊन खून केला होता. सुपारी वाजवूनही या खुनाचे त्याला काहीच पैसे मिळाले नव्हते. यावरूनच रूपेश पवार आणि त्याच्या मित्रांनी अभिजितला चिडवले होते. याचाच राग आल्याने अभिजितने १२ ऑगस्ट २०२० रोजी रूपेशच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केला होता. त्याच्याविरुद्ध कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यातही २०१३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. अभिजित हा गुजरातच्या वापी येथे असल्याची माहिती पोलीस नाईक दादा पाटील यांना मिळाली. त्याअनुषंगाने अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक, आणि चंद्रकांत वाळुंज आदींनी गुजरातच्या वापी आणि शहरात २७ ऑक्टोबर रोजी शोध घेतला. मात्र, तिथून तो कोल्हापूर येथे मूळ गावी सटकला. मोबाइलचा वापर टाळून तो कोल्हापुरातून अंबरनाथ येथे निसटला. अखेर, ३० ऑक्टोबर रोजी अंबरनाथ एमआयडीसी भागातून युनिट-१ च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
खून करून पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 05:36 IST