पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फसणारी धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला. आरोपी महिलेचा पती हा मेकअप आर्टिस्ट होता. गोरेगाव आरे परिसरातील छोटा काश्मीर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी आणि या गुन्ह्यात साथ देणारा तिचा साथीदार रंगा यांना अटक केली आहे. तर, या महिलेचा प्रियकर चंद्रशेखर फरार आहे.
आरोपी महिला राजश्रीने तिचा प्रियकर आणि त्याचा भाऊ रंगा याच्यासोबत मिळून तिचा पती भरतला बेदम मारहाण केली, पण भरत त्यावेळी आरोपींना चकवून पळून गेला आणि त्याने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. घरी आल्यानंतर राजश्रीने भरतला धमकी दिली आणि म्हणाली की, जर त्याने कोणालाही याबद्दल सांगितले की, तर ती त्याला आणि त्यांच्या मुलालाही मारून टाकेल. जर, कोणी विचारले तर त्यांना मी बाईकवरून पडलो, त्यामुळेच मला दुखापत झाली, असे सांगायचे अशी धमकी तिने दिली.
भरतची पत्नी राजश्रीचे सुमारे एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. जेव्हा तिच्या पतीला हे कळले, तेव्हा त्याने याला विरोध केला. त्यानंतर राजश्रीने भरतला सांगितले की, तिने चंद्रशेखरला तिच्या मोबाईलवरून ब्लॉक केले आहे, परंतु नंतर कळले की राजश्रीने प्रियकराचा मोबाईल नंबर पूजाच्या नावाने सेव्ह केला होता.
त्याला इतके जोरात मार की तो मरेल!१२ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास राजश्रीच्या फोनवर प्रियकर चंद्रशेखरचा फोन आला, तेव्हा या गोष्टीवरून भरतचे तिच्याशी भांडण झाले. त्यावेळी भरतची मोठी मुलगी आणि दोन्ही लहान मुलगे घरात होते. भांडणानंतर पत्नी राजश्रीने तिच्या प्रियकराला फोन करून म्हटले की, भरतला बाहेर बोलावून त्याला मारहाण कर. तू त्याला इतकी मारहाण कर की, तो मरेल किंवा एक वर्ष अंथरुणाला खिळून राहील.
मुलीने उघड केला गुन्हा!घटनास्थळी उपस्थित असलेली भरतची मुलगी श्रेया हिने पोलिसांना सांगितले की, १२ जुलै रोजी आईने चंद्रशेखरला फोन केला तेव्हा आई वडिलांसोबत बाहेर गेली. तिथे शौचालयाजवळ चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगा यांनी मिळून माझ्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनी भरतला इतकी मारहाण केली की, त्यांच्या पोटातील नस तुटली. छातीची हाडे तुटली. त्यावेळी माझी आई जवळच उभी होती आणि त्यांना आणखी मारहाण करण्यास सांगत होती. मी काही अंतरावर उभी होते. जेव्हा मी ऐकले की, माझी आई वडिलांना खूप मारहाण करायला सांगत आहे, तेव्हा मी घाबरलो आणि घरी पळत आले.
या क्रूर आईने मुलीला देखील धमकावले. कुणाला काही सांगितल्यास तुला जीवे मारेन, अशी धमकी तिने मुलीला दिली. भरत कसाबसा घरी आला. पण, तीन दिवसांनी त्याला उलट्या होऊन तो बेशुद्ध पडला. तेव्हा त्याच्या मुलीने आपल्या काकाला याबद्दल सांगितले. यानंतर भरतला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर ५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, उपचारादरम्यान ५ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयात असताना भरतने पत्नीच्या कृत्याचा पाढा वाचला. यानंतर त्याच्या मुलीनेही आईचा गुन्हा उघड केला. आरे पोलिसांनी या प्रकरणात हत्या आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला असून, भरतच्या पत्नीला अटक केली आहे. मात्र, तिचा प्रियकर अजूनही फरार आहे.