लोकमत न्यूज नेटवर्ककोरची (गडचिरोली): तालुक्यातील बोरी गावात एका खासगी डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या छत्तीसगडच्या रुग्ण महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना २ जुलै रोजी उघड झाली आहे. पीडिता आपल्या भावासह दवाखान्यात आली होती. भावाला बाहेर बसवले तर पीडितेला आपल्या दालनात बोलावून डॉक्टरने हे कुकर्म केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुभाष हरप्रसाद बिस्वास (४८, रा. बोरी, ता. कोरची) असे डॉक्टरचे नाव असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नजीकच्या छत्तीसगड राज्यातील एका २६ वर्षीय पीडित महिलेने बेडगाव पोलिस मदत केंद्रात फिर्याद दिली. ती सध्या पदवीचे शिक्षण घेत असून, तिला जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे ती भावासोबत दुचाकीने बोरी येथे २ जुलै रोजी उपचारसाठी आली होती.
सकाळी ९ वाजता डॉ. सुभाष बिस्वास याने भावाला बाहेर बसवले तर महिलेला आपल्या दालनातील खाटेवर झोपायला लावले. यावेळी तपासणीच्या नावाखाली पोटाला हात लावला, नंतर बॅड टच करून अत्याचार केला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर भाऊ धावत आला. यावेळी भावाने डॉ. सुभाष बिस्वास याला जाब विचारला असता, त्याने अरेरावी केली. यानंतर पीडितेने बेडगाव पोलिस मदत केंद्रामध्ये जात तक्रार दिल्याने भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६४ (२) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी डॉक्टरची रवानगी न्यायालयीन कोठडीतपीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव पोलिस मदत केंद्रातील अधिकारी व अंमलदारांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या. पुढील तपास उपनिरीक्षक वर्षा बोरसे करत आहेत. कुरखेडा न्यायालयाने त्यास ३ जुलै रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.