गंमत आणि त्यातून झालेला किरकोळ वाद किती भीषण वळण घेऊ शकतो, याचा थरार गुरुग्रामच्या रामपुरा परिसरात पाहायला मिळाला. एका वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये झालेल्या मस्करीचे रूपांतर वादात झाले आणि संतापलेल्या एकाने दुसऱ्याच्या गुप्तांगात थेट इंडस्ट्रियल एअर कॉम्प्रेसरने हवा भरली. हवेचा दाब इतका प्रचंड होता की, पीडित तरुणाची आतडी फाटून शरीराबाहेर आली आणि उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रामपुरा येथील 'तरुण एंटरप्राइजेस' नावाच्या वर्कशॉपमध्ये हरविंदर आणि नरेश हे दोघे एकत्र काम करायचे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्यात नेहमीप्रमाणे मस्करी सुरू होती. मात्र, या मस्करीतून अचानक दोघांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात नरेशने वर्कशॉपमधील शक्तिशाली एअर कॉम्प्रेसरचे नोजल हरविंदरच्या गुप्तांगावर लावून प्रेशर सुरू केले.
शरीरात झाला बॉम्बसारखा स्फोट!
कॉम्प्रेसरमधील हवेचा दाब एवढा भयानक होता की, काही सेकंदातच हरविंदरचे पोट फुगून आतडी फाटली आणि शरीराबाहेर आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हरविंदरला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शरीरातील अंतर्गत अवयव पूर्णपणे निकामी झाल्याने मंगळवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. "शरीरात गेलेली हवा एखाद्या बॉम्बसारखी फुटली, ज्यामुळे अंतर्गत अवयवांच्या चिंधड्या झाल्या," असे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
पाच मुले झाली पोरकी
मृत हरविंदर हा गेल्या ८ वर्षांपासून गुरुग्राममध्ये वेल्डर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात ४ मुली आणि १ लहान मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबाचा आधार हरपला असून गावाकडे राहणाऱ्या त्याच्या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आरोपी गजाआड, पोलिसांकडून तपास सुरू
खेड़की दौला पोलिसांनी हरविंदरच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी नरेश कुमारविरुद्ध हत्येचा (कलम ३०२) गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. हा प्रकार केवळ रागाच्या भरात झाला की यामागे काही जुना वाद होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
एअर कॉम्प्रेसरचा वापर टायर फुगवण्यासाठी किंवा धातू स्वच्छ करण्यासाठी केला जातो. मानवी शरीराच्या कोणत्याही भागावर याचा वापर करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. कामाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या जीवघेण्या मस्करी टाळण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
Web Summary : A workplace prank in Gurugram turned fatal when a man used an air compressor on his friend's genitals, causing internal injuries and death. Police arrested the accused; investigation continues.
Web Summary : गुरुग्राम में एक कार्यस्थल पर मज़ाक जानलेवा बन गया जब एक आदमी ने अपने दोस्त के गुप्तांगों में एयर कंप्रेसर से हवा भर दी, जिससे आंतरिक चोटें आईं और उसकी मौत हो गई। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया; जांच जारी है।