लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं २० वर्षीय युवतीला एका मुस्लीम युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या युवकाने युवतीसमोर हनुमान चालीसा आणि शिवचालीसा वाचून तिला विश्वास मिळवला. त्यानंतर तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याबाबत युवतीने पोलीस ठाणे गाठून तिथे युवकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
तक्रारीत युवतीने म्हटलंय की, गावात राहणाऱ्या मुस्लीम युवक राशिदने आधी माझ्यासोबत मैत्री केली. सुरुवातीला त्याने हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्माला मानतो असं सांगितले. त्याने हनुमान चालीसा आणि शिवचालीसा बोलून माझा विश्वास जिंकला. त्यानंतर तो माझ्यावर खरे प्रेम करतो असं त्याच्या वागण्यावरून जाणवले. माझ्यासमोर तो हिंदू धार्मिक भजन, चालीसा ऐकायचा. त्यामुळे माझा त्याच्यावरचा विश्वास आणखी वाढत गेला. काही काळाने राशिदने त्याचा खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. त्याने माझ्यावर इस्लाम कबूल करण्यासाठी दबाव आणला. जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्याने पैसे आणि परदेशातील चांगले जीवन जगण्याचे आमिष दाखवले असं तिने सांगितले.
तसेच सौदी अरब आणि बांगलादेशात त्याचे नातेवाईक राहतात असं राशिदने युवतीला सांगितले. जर मी इस्लाम कबूल केला तर आपण तिथे जाऊया. सर्वकाही ठीक होईल असं राशिद सांगत होता. मात्र मी धर्म परिवर्तन करण्यास नकार दिला तेव्हा त्याने माझे एडिटेड फोटो व्हायरल करून कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने रस्त्यातच मला अडवून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. एकदा फुलांचा गुच्छ फेकून धमकावण्याचा प्रयत्न केला असं सांगत युवतीने राशिदच्या छळाला कंटाळून एकदा आत्महत्या करण्याचा विचारही आल्याचे पोलिसांना म्हटले.
दरम्यान, बराच काळ भीती आणि मानसिक दडपणाखाली असणाऱ्या युवतीने तिच्यासोबत घडत असलेला प्रकार हिंमत करून तिच्या घरच्यांना सांगितला तेव्हा कुटुंबाने तिला साथ देत राशिदविरोधात पोलीस तक्रार देण्यास सांगितले. युवतीच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी राशिदवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. राशिदचे नातेवाईक बांगलादेश, सौदी अरबला राहत असल्याने त्याचीही कसून तपास केला जात आहे. या प्रकरणात पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत.