कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यात चोरीची मोठी घटना घडली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या एका शाखेत देशी पिस्तुल आणि अन्य शस्त्रांच्या बळावर तोंडाला मास्क घालून ही चोरी करण्यात आली आहे.
सुरुवातीच्या माहितीनुसार, बँकेतून ५८ किलो सोने आणि ८ कोटींची रोकड चोरी झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी बँकेत अचानक चोर शिरले, त्यांनी कर्मचाऱ्यांना बंधक बनवले. त्यानंतर बँकेत लुट करून तिथून पसार झाले. या चोरांनी चोरीसाठी वापरलेली कार महाराष्ट्रातील पंढरपूर येथे सापडली आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांकडून एकत्रित संयुक्त सर्च अभियान सुरू करण्यात आले आहे. चोरीच्या घटनेनंतर पोलीस अधिकारी बँकेत पोहचले. त्यावेळी बँकेबाहेर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमा झाली होती. या चोरांनी सैन्याची वर्दी घालून चोरी केली आहे. चोरांनी मॅनेजर, कॅशियर आणि कर्मचाऱ्यांना धमकावले आणि त्यांना अलार्म बटण दाबण्यापासून रोखले.
कर्नाटकातील कॅनरा बँकेतील दरोडा
यापूर्वी कर्नाटकात आणखी एका बँक दरोड्याने खळबळ उडाली होती. जून २०२५ मध्ये कर्नाटकातील विजयपुरा येथील कॅनरा बँकेच्या शाखेतून दरोडेखोरांनी ५९ किलो गहाण ठेवलेले सोने आणि ५.२ लाख रुपये चोरले होते. हे तेच शहर आहे जिथे अलीकडेच झालेल्या एसबीआय दरोड्याच्या नियोजित योजना आखण्यात आली होती.कॅनरा बँकेतील दरोड्याच्या संदर्भात पोलिसांनी बँक व्यवस्थापकासह तीन प्रमुख संशयितांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मनागुली गावातील कॅनरा बँकेच्या शाखेचा माजी व्यवस्थापक विजयकुमार मिरियल हा या दरोड्याच्या सूत्रधार होता. त्याला माजी बँक कर्मचारी आणि आता कंत्राटदार आणि कॅसिनो ऑपरेटर चंद्रशेखर नेरेला आणि मिरियलचा सहाय्यक सुनील मोका यांच्यासह अटक करण्यात आली.