नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची क्रेझ सर्वच तरुणांमध्ये आहे. त्यात लहान मुलांपासून वयस्कापर्यंत अनेकजण त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये आहे. २५ जुलैला दिल्लीतील ३ अल्पवयीन मुले गायब झाल्याची बातमी समोर आली होती. ही मुले सलमान खानला भेटण्यासाठी घरातून निघून गेली. आता या तिघांना शोधण्यात आले असून तिघेही सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माहितीनुसार, ही तीन मुले दिल्लीतून बेपत्ता झाली होती. त्यांचे वय १३, ११ आणि ९ वर्ष इतके आहे. हे तिघेही दिल्लीतील सदर बाजार इथल्या एका शाळेत शिकतात. २५ जुलैला तिघेही बेपत्ता झाल्याचं समोर आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेचा तपास केला तेव्हा हे तिघे महाराष्ट्रातील वाहिद नावाच्या व्यक्तीसोबत गेमिंग APP माध्यमातून बोलत असल्याचे कळले. वाहिदने या मुलांना तो एकदा सलमान खानला भेटल्याचे सांगितले. मी तुमची सलमान खानशी भेट घडवू शकतो असं वाहिदने मुलांना म्हटले. वाहिदवर विश्वास ठेवून या तिघांनी मुंबईला जाण्याचा प्लॅन बनवला असं पोलिसांनी सांगितले.
तर या तिघांनी घरच्यांना न सांगता २५ जुलैला सलमान खानला भेटायला जायचे ठरवले. तिघे अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबाला चिंता लागली. त्यानंतर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार करण्यात आली. सुरुवातीच्या तपासात पोलिसांना एका मुलाच्या घरात हाताने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात आम्ही वाहिदला भेटायला जातोय. तिथून सलमान खानला भेटू असं लिहिले होते. पोलिसांनी या घटनेत अजमेरी गेटवर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा ही मुले ट्रेनने महाराष्ट्रात गेल्याचा अंदाज लावला. मग पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांची मदत घेतली आणि दोन्ही राज्यांची पोलीस मिळून मुलांचा शोध घेऊ लागली.
दरम्यान, बेपत्ता मुलांचा पोलीस शोध घेत आहे हा प्रकार वाहिदला कळला. त्यानंतर त्याने त्या मुलांना सलमान खानला भेटवण्याचा प्लॅन रद्द केला. मग हे तिघेही नाशिक स्टेशनला उतरले. फोनच्या माध्यमातून लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी मुलांचा शोध घेतला. हे तिघे नाशिक रेल्वे स्टेशनला सुखरूप सापडले. महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी या तिघांना पुन्हा दिल्लीत आणून त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे.