भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी बीज प्रमाणीकरण विभागात ४ महिन्यापूर्वी झालेला १० कोटींच्या घोटाळ्यात नवीन खुलासा उघड झाला आहे. यात पोलिसांनी विभागातील शिपायासह ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे जे बँक मॅनेजरसोबत या घोटाळ्यात सहभागी होते.
घोटाळ्यातील पैशातून कोट्यवधींची जमीन खरेदी करून या योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान हडप करून शासकीय योजनेचा लाभ घेण्याची योजनाही आखण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच ते पोलिसांच्या हाती लागले. पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलिस पथकाला ३० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
काय आहे प्रकरण?
१४ सप्टेंबर २०२४ रोजी बीज प्रमाणीकरण अधिकारी सुखदेव प्रसाद अहिरवार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यात इमामी गेट येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियात विभागाची १० कोटींची एफडी तोडून ती रक्कम विभागातील शिपाई बी.डी नामदेव यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. त्यात बँकेचे मॅनेजर नोएल सिंह यांचाही सहभाग असल्याचा आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणी एसआयटी नेमून तपास सुरू केला. आरोपी शिपाई त्याचा मोबाईल बंद करून फरार झाला होता. जोपर्यंत हे प्रकरण समोर येईल त्याआधीच बँकेच्या मॅनेजरची बदली झाली होती. एसआयटीने त्यांचा तपास वेगाने सुरू केला त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. या घोटाळ्यात शिपाई आणि बँक मॅनेजरसह इतर ८ लोकही सहभागी होते.
पोलिसांनी सांगितले की, मध्य प्रदेशच्या बीज प्रमाणीकरण संस्थेतील शिपाई बी.डी नामदेव याने त्याच्या विभागातील सहकारी लेखा सहाय्यक पदावर कार्यरत असणाऱ्या दीपक पंथीसोबत मिळून विभागात बनावट कागदपत्रे आणि सील तयार केले. त्यानंतर बँक मॅनेजर नोएल सिंह यांच्यासोबत मिळून बीज प्रमाणीकरण विभागाची १० कोटींची एफडी तोडली आणि ती रक्कम शिपायाच्या खात्यावर ट्रान्सफर केली. विशेष म्हणजे शिपाई, लेखा सहाय्यक, बँक मॅनेजर यांनी जी बनावट कागदपत्रे तयार केली त्यात बोगस सील आणि कागदावर शिपाई बी.डी नामदेव याला विभागाचा अधिकारी दाखवण्यात आले. बँकेतील १० कोटींची एफडी तोडून ५-५ कोटींचे २ डिमांड ड्राफ्ट तयार करण्यात आले.
दरम्यान, १० कोटींची रक्कम बी.डी नामदेव याने त्याच्या खात्यावर घेतल्यानंतर ती रक्कम ५० विविध खात्यांवर ट्रान्सफर करण्यात आली. ज्यात आरोपी शैलेंद्र प्रधान आणि अन्य आरोपींनी मिळून बनावट फर्म तयार करून बँक खाते उघडले होते. या बँक खात्यात १० कोटी रक्कम पोहचली. ज्या लोकांच्या खात्यावर ही रक्कम गेली त्यांनी कमिशन कट करून बँकेतून रोकड काढली. आरोपींनी केवळ घोटाळा केला नाही तर १० कोटींपैकी ६ कोटी ४० लाख रुपये आणि १ कोटी २५ लाख रुपयांची २ ठिकाणी जमीन खरेदी केली. खरेदी केलेल्या जमिनीवर ५-५ एकरात ३ वेगवेगळे प्रकल्प सुरू करणार होते ज्यात सरकारी योजनेतून ५ कोटीपर्यंत कर्ज घेण्याची तरतूद होती.
आरोपी कसे पकडले?
हे प्रकरण उघडकीस येताच आरोपी बी.डी नामदेव आणि बँक मॅनेजर नोएल सिंह यांचा एसआयटी शोध घेत होती. दोघेही मोबाईल बंद करून फरार झाले होते. तपासात बीज प्रमाणीकरण संस्था, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि एमपी नगर येथील येस बँकेशी निगडीत कागदपत्रे जप्त करण्यात आली. बीज प्रमाणीकरण संस्थेचे लेखा सहाय्यक दीपक पंथी यांना अटक करण्यात आली. दीपकच्या चौकशीनंतर येस बँकेचे सेल्स मॅनेजर धनंजय गिरी आणि शैलेंद्र प्रधान यांनाही अटक झाली.