सितम सोनवणे , लातूरनुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्या सभापतींची निवड विधानसभा डोळ्यापुढे ठेवून आ. अमित देशमुखांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवित बेरजेच्या राजकारणाची गणिते मांडून यशस्वी केली आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी आमदार शिवाजीराव कव्हेकरांना अध्यक्षपदावर बसवून पुढची वाट त्यांनी सोपी केली होती. आता मारवाडी, लिंगायत, मातंग आणि मराठा या अशा सर्वंकश समीकरणातून व्यूहरचना करीत सभापती निवडले. त्यात महिलांना संधी देत काँग्रेसच्या महिला धोरणांनाही चांगली बळकटी दिली. लातूर जिल्ह्याच्या राजकारणात दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख ही काका पुतण्याची जोडी नवी समीकरणे मांडीत आहे. अध्यक्ष पदावर महिला आणि पक्षाअंतर्गत विरोधक शिवाजीराव कव्हेकर यांना संधी देत काँग्रेसच्या महिला धोरणाला बळकटी आणि पक्षातील भेदाला मूठमाती दिली. त्यापाठोपाठच समित्यांचे सभापती निवडतानाही बांधकाम सभापती सपना घुगे (साकोळ गट), महिला बालकल्याण सभापतीपदी सुलोचना बिदादा (लामजना गट) तर समाजकल्याण सभापतीपदी वेणुताई गायकवाड (पोहरेगाव गट) आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी कल्याण पाटील (वाढवणा गट) यांची बिनविरोध निवडीला प्राधान्य दिले़ जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापतीपदी अशाप्रकारे चार महिलांची निवड झाली आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीआधी जातीय समिकरणांची जुळवा-जुळव करीत मारवाडी, लिंगायत आणि मातंग अशा सर्व जातींना सत्तेत स्थान देत त्यांनी नवी समीकरणेही जोडली असल्याचे बोलले जात आहे़ सर्वाधिक चातुर्य दिसले ते म्हणजे अध्यक्ष निवडीत लातूर शहर, उपाध्यक्ष निवडीत चाकूर तालुक्याला न्याय देणारी देशमुख गटाने सभापती पदे देताना औसा तालुक्यातून सुलोचना बिदादा, लातूर ग्रामीणमधून रेणापूरच्या वेणूताई गायकवाड, उदगीर तालुक्यातून वाढवण्याचे सदस्य कल्याण पाटील आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातून साकोळच्या सपना घुगे यांना प्राधान्य देत तालुक्यांना न्याय दिला. शिवाय अध्यक्षपदात कव्हेकर गटाला प्राधान्य देत सभापती पदे देताना निलंगेकर गट, चाकूरकर गट, आणि देशमुख गट अशा काँग्रेसमधील सर्व गटांना मान दिला गेला. विधानसभा निवडणुकीत कोणत्या जाती प्रभावी ठरु शकतात याची जातीय समिकरणेही काँग्रेस पक्षांनी लावून या निवडी केल्या आहेत़ या अनुषंगानेच सहाही मतदार संघातील उमेदवारांना प्राधान्य देवून जातीय गणित जमविली गेली़
जि.प. सभापती निवडीत बेरजेचे राजकारण
By admin | Updated: October 6, 2014 00:14 IST