लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : ‘त्यांना’ शिकायचे आहे, शिकून स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे; पण त्यासाठीची साधने कोण देणार? असा प्रश्न आगामी शैक्षणिक वर्षामध्ये शाळेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पडू नये, यासाठी कळंब येथील स्व. गणपतराव कथले युवक आघाडीने पुढाकार घेतला आहे. समाज सहभागातून या युवकांनी ‘शिक्षणदूत’ म्हणून काम करण्याची तयारी चालविली आहे.‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ असा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला; परंतु हे दूध परिस्थितीमुळे अनेकांपर्यंत पोहोचतच नसल्याचे चित्र दिसते. अनेकांना शाळेत प्रवेश मिळतो; पण वह्या, पुस्तके, दफ्तर आदी शैक्षणिक साहित्यांसाठी त्यांची परवड होते. पालकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने शिकण्यासाठी धडपडणारे बालपण या साहित्यांअभावी शिक्षण घेते. याच विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कळंब येथील स्व. गणपतराव कथले युवक आघाडीने पुढाकार घेतला आहे. येत्या १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये कळंब शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीशी झडगणारे विद्यार्थी शालेय पुस्तके, वह्या, दफ्तर आदी साहित्यापासून वंचित राहू नये यासाठी या युवकांनी आता पुढाकार घेतला आहे. मागील वर्षीचे जुनी शालेय पुस्तके, अर्धवट भरलेल्या वह्या, वापरात न येणारी दफ्तरे आघाडीतील युवकांनी नागरिकांकडून जमा करण्यास सुरुवात केली आहे. हे साहित्य गोळा करून त्याची वर्गनिहाय विभागणी केली जाणार आहे. वह्यांमधील कोऱ्या पानांना बाजूला काढून त्यांची पुन्हा बांधणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुन्या दफ्तरांनाही नवा लूक देण्यासाठी त्याच्यावर काही प्रक्रिया करता येते का? या अनुषंगाने तयारी केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ज्यांना या साहित्याची आवश्यकता आहे, अशांना हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच गावातील विविध मंडळे, संघटना यांच्याशी संपर्क साधण्यात येणार आहे. यंदा प्रथमच असा उपक्रम हाती घेतल्यानंतर नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी युवकांचा पुढाकार !
By admin | Updated: May 20, 2017 23:35 IST