लातूर : दरवर्षीच्या तुलनेत लग्नसराईतील सोन्या-चांदीची खरेदी निम्म्यावर आली आहे़ दुष्काळ आणि अवकाळी पावसाच्या गर्तेत शेतकरी असल्याने त्याचा परिणाम खरेदीवर दिसून येत आहे़ त्यामुळे काहीजण मोठ्या शहरांत खरेदी करण्याऐवजी गावातच खरेदी करीत आहेत़ दुष्काळाच्या अनुषंगाने यंदा सोने खरेदीची चमक फिकी ठरत आहे़ नवरदेव, इवायांच्या संमतीने पाडवा व दिवाळीचा हवाला देत वधूपित्यांकडून लग्नसराईत अर्धे सोने खरेदी केले जात आहे़ उर्वरीत हौस सणावाराला पूर्ण करु असे अभिवचन दिले जात आहे़ मे महिन्यात लग्न तारखांसाठीअनेकांची खरेदी पूर्ण झाली असून, जून महिन्यात ६-७ लग्नाच्या तारखा असल्याने, लग्नसराई अंतिम टप्प्यात आहे़ यंदाची दुष्काळजन्य परिस्थिती, अवकाळी, गारपीटीमुळे लातूर जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील वधुपित्यांनी लग्नसराईच्या काळातील खरेदी निम्म्यावरच ठेवली आहे़ अनेकांनी आपापल्या गावातील दुकानातूनच उधार वायद्यांवर खरेदीचा भर दिला आहे़ त्यामुळे शहराच्या तुलनेत खेड्यापाड्यात उधार वायद्याची खरेदी वाढली आहे़ दहा वर्षापूर्वी ज्या गावात दोन सराफा दुकाने होती, तिथे दुकानांची संख्या १०-१२ वर पोहोचली आहे़ त्यामुळे ग्राहकसुद्धा गावातच खरेदी करीत आहेत़ केवळ हौशी ग्राहक शहरांकडे वळत असल्याचे चित्र आहे़ गतवर्षी लग्नसराईच्या हंगामात १ तोळा सोन्याचा भाव ३० हजारांच्या घरात होता़ यंदा ३ हजार रुपये कमी म्हणजे लग्नसराईच्या प्रारंभीच्या काळात फेब्रुवारी, मार्च महिन्यात २७ हजार रुपये प्रतितोळा सोन्याचा भाव राहिला़ आज घडीला २७ हजार ७०० रुपये प्रतितोळा सोन्याचा भाव आहे़ तर चांदीचा भाव ४० हजार रुपये प्रतिकिलो आहे़ लग्नसराईचा हंगाम सुरु असताना प्रारंभीच्या काळात ज्यांनी सोने खरेदी केली, ते फायद्यात राहिले़ चोखंदळ ग्राहक बाजारातील वैविध्यपूर्ण वस्तू आणि योग्य भाव यांच्यात सांगड घालण्यात यशस्वी ठरतात़ लग्नसराईची खरेदी करण्यासाठी सहकुटुंब दुकानात गर्दी करतात़ नातेवाईकांसह आई-वडील, उपवधू, उपवर दुकानात खरेदीसाठी दाखल होतात़ नवीन पद्धतीचे दागदागीणे आणि आकर्षक डिझाईनचे दागिणे खरेदीसाठी नागरीकांचा कल दिसून येत असल्याचे सराफा व्यापारी प्रताप किनीकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)लातूर शहरात सुमारे ३५० सराफा तर ५०० सुवर्णकार कारागीर आहेत़ शिवाय, कंपन्यांचीही मोजकी दुकाने आहेत़ गतवर्षीच्या तुलनेत ३ हजारांनी सोन्याचा भाव उतरलेला आहे़ गतवर्षी ३० हजार रुपये प्रतितोळा सोने होते़ यंदा २७ हजार रुपयांचा भाव होता़ यंदाच्या लग्नसराई हंगामात एका-एका दुकानात प्रतिमहा सरासरीने शंभर-दीडशे बस्ते बांधले गेले़ ओळखी-पाळखीचे ग्राहक हेच सोन्या-चांदीच्या व्यवसायातील मुख्य भांडवल असल्याची प्रतिक्रीया लातूर सराफा असोशियशनचे अध्यक्ष विश्वनाथ किनीकर यांनी दिली़
यंदाच्या लग्नसराईत सोन्याची चमक फिकी
By admin | Updated: May 20, 2015 00:19 IST