वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत एका वृद्ध उद्योजकाचा कामगाराने खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्यामुळे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे. कामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून या कामगाराने खून करून मुंबईच्या न्यायनगर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्यामुळे या खुनाला वाचा फुटली आहे.याविषयी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याशी मुंबईच्या न्यायनगर पोलिसांनी संपर्क साधून वाळूज एमआयडीसीत एका उद्योजकाचा खून केलेल्या आरोपीने आमच्याकडे आत्मसमर्पण केल्याचे सांगितले. आरोपी गणेश येवले (रा. हदगाव, जि. नांदेड) याने १० ते १२ दिवसांपूर्वी उद्योजक रामेश्वर दरक (वय अंदाजे ७० ते ७५) यांनी कामाचे पैसे न दिल्यामुळे आपण त्यांचा कंपनीत डोक्यात लोखंडी फावडे मारून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राहुल श्रीरामे, निरीक्षक रामेश्वर थोरात, ए. डी. जहारवाल, पोहेकॉ. रामदास गाडेकर, पोकॉ. बाळासाहेब आंधळे आदींच्या पथकाने वाळूज एमआयडीसीतील वैष्णोदेवी उद्यानासमोरील कंपनीत जाऊन पाहणी केली असता खुनाची घटना खरी असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी उद्यानासमोर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.कामाचे पैसे न दिल्याने खूनदरक यांच्या कंपनीत पावडरचे उत्पादन केले जाते. काही दिवसांपासून कंपनीत उत्पादन बंद असल्याचे तसेच येवले हा या कंपनीत काम करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. येवले याने कामाचे पैसे दरक यांना मागितले होते. मात्र, त्यांच्यात वादविवाद झाल्यामुळे येवलेने दरक यांचा फावडे डोक्यात मारून खून केला.खुर्चीवरच होता मृतदेहपोलिसांनी कंपनीत पाहणी केली असता दरक यांचा मृतदेह खुर्चीवरच पडलेला आढळला. हा मृतदेह सडून त्यात अळ्या झाल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी मास्क लावून आत पाहणी केली असता घटनास्थळाजवळ रक्ताचे थारोळे साचलेले तसेच एक लोखंडी फावडे आढळले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी फौजदार भागचंद खरात यांच्या तक्रारीवरून येवलेविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ए. डी. जहारवाल करीत आहेत.खून करून मुंबईला पसारयेवले खून करून पकडले जाण्याच्या भीतीने मुंबईला पसार झाला. मात्र, पोलीस पकडतील या भीतीने त्याने रविवारी सकाळी मुंबईतील न्यायनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली दिली. मयत उद्योजक कुटुंबापासून दूरमयत दरक हे गोरेगाव, मुंबई येथील मूळ रहिवासी असून, त्यांची पत्नी, एक मुलगा विदेशात तर दोन विवाहित मुली सासरी असल्याचे त्यांचे सावत्र भाऊ काशीनाथ दरक (रा. औरंगाबाद) यांनी पोलिसांना सांगितले. रामेश्वर दरक हे नातेवाईकांशी फारसा संपर्क ठेवत नव्हते. ते स्वत:च्या कंपनीत व परिसरातील लॉजमध्ये राहत. कंपनी बंद असल्याने मृतदेह तेथे दहा- बारा दिवसांपासून असूनही कोणाला कळले नाही. त्यांच्या मुलींशी संपर्क साधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.पोलीस पथक मुंबईला रवाना४येवले याला ताब्यात घेण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पथक मुंबईस गेले आहे. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर खून नेमक्या कोणत्या कारणावरून करण्यात आला, याची खातरजमा केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.