औरंगाबाद : शेंद्र्यातील एनआरबी इंडस्ट्रीयल बेअरिंग कंपनीत बोनसचा वाद चिघळला आहे. नव्या अध्यादेशानुसार वाढीव बोनस देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपाशीपोटी काम करण्याबरोबरच व्यवस्थापनाने देऊ केलेली मिठाईदेखील कामगारांनी नाकारली आहे.शेंद्रा येथील ‘एनआरबी’ इंडस्ट्रीयल बेअरिंगमध्ये १७६ कामगार कार्यरत आहे. एनआरबी इंडस्ट्रीयल कामगार, कर्मचारी संघटना ही अंतर्गत युनियन कार्यरत आहे. शेंद्र्याबरोबरच वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतही ‘एनआरबी’चे कारखाने आहेत. नव्या अध्यादेशानुसार कामगारांना २१ हजार बोनस देणे गरजेचे होते; परंतु प्रत्यक्षात ८,४०० रुपयांचा बोनस कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. वाढीव बोनस देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी शुक्रवारी कामगार उपायुक्त कार्यालयात धाव घेतली. प्रभारी कामगार उपायुक्त गीते कार्यालयात नसल्याने सहायक आयुक्त मेश्राम यांना निवेदन सादर केले. उपायुक्तांना दिलेल्या निवेदनावर विजय दाभाडे, अनिल अचलखाम, रवी काळे, संतोष दांडगे, कचरू खरबे, ओमकार पटाईत, राहुल नरवडे, अजीम खान, विनोद खंडागळे, संतोष खांदे, देवेंद्र लांडे, सिद्धार्थ खिल्लारे, सुदर्शन वाघमारे यांच्या सह्या आहेत.
‘एनआरबी’ कंपनीमध्येही कामगारांचे अन्नत्याग आंदोलन
By admin | Updated: October 29, 2016 00:49 IST