औरंगाबाद : आॅक्टोबर २०१३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागच्या अखत्यारीत येणाऱ्या २१ कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम १९ महिन्यांपासून प्रगतिपथावर आहे. गेल्या शासनाने मंजूर केलेला निधी प्राप्त करून घेण्यात विभागाला अनेक अडथळे पार करावे लागले. तेव्हा कुठे ५० टक्के रस्त्यांची कामे मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उर्वरित कामे पावसाळ्यात करण्याची नामुष्की विभागावर ओढवली आहे. पावसाळ्यात डांबरीकरणातून रस्त्यांची कामे होण्यात अनेक अडचणी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील २१ कि़मी. रस्त्यांसाठी २१ कोटी रुपयांचा तातडीचा निधी आॅक्टोबर २०१३ मध्ये मंजूर झाला. शहरातील सुमारे १,३०० कि़मी. रस्ते महापालिकेचे आहेत. त्यामध्ये १२५ कि़मी.चे रस्ते विकास आराखड्यातील आहेत आणि २० कि़मी.चे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहेत. उपअभियंता के.टी. वाघ यांनी सांगितले की, सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंतचे काम सुरू आहे. मध्यंतरी निधीअभावी ते काम बंद होते. पंचवटी चौक ते छावणी लोखंडी पुलापर्यंतचा रस्ता झाला आहे. हर्सूल ते सावंगीपर्यंतच्या रस्त्याचे काम बंद आहे. जालना रोडचे काम पूर्ण झाले आहे. मस्कट व अरोरा कन्स्ट्रक्शन्सकडे रस्त्याची कामे असून २० टक्के काम अजून शिल्लक आहे. ३१ मेपर्यंत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. १६ कोटी रुपयांपर्यंतची कामे होत आली आहेत. ड्रेनेज व मुरूम टाकण्याची कामे पावसाळ्यात होऊ शकतात.
१९ महिन्यांपासून कामे सुरूच
By admin | Updated: May 26, 2015 00:51 IST