नांदेड: शहरात बीएसयुपी योजनेतंर्गत बांधण्यात येत असलेल्या अर्धवट घरकुलांचे कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना उपायुक्त डॉ़ विद्या गायकवाड यांनी आज संबंधित अधिकार्यांना दिल्या़ बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १२ हजार २२० घरकुलांचे कामे पूर्ण झाले असून ३ हजार ६९३ घरांचे कामे प्रगतीपथावर आहेत़ एकूण २७ हजार ९८५ घरकुलांची उभारणी करण्यात येणार आहे़ या योजनेला २०१५ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने उर्वरित घरांचे कामे पूर्ण होण्यास संधी मिळाली आहे़ मात्र मागील सहा महिन्यांपासून शहरातील घरकुलांची कामे कासवगतीने सुरू आहेत़ पावसाळा तोंडावर असल्याने घरकुलांचे कामे पूर्ण करण्याची आवश्यकता आहे़ साडेतीन हजार घरकुलांची कामे अर्धवट असून त्याचे कामे प्राधान्याने करून दोन महिन्यांत लाभार्थ्यांना घराचा ताबा द्यावा, अशा सूचना उपायुक्त गायकवाड यांनी दिल्या़ या योजनेवर साधारणपणे साडेचारशे कोटी रूपये खर्च झाले आहेत़ दरम्यान, घरकुलाचे कामे मार्च २०१४ पर्यंत पूर्ण होणे अशक्य असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाने दोन वर्षासाठी मुदतवाढ मागितली होती़ या प्रस्तावावर केंद्र शासनाने निर्णय घेवून मार्च २०१५ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार महापालिकेला आता पुढील १२ महिन्यात उर्वरित घरकुलांचे कामे पूर्ण करणे आवश्यक आहे़ बैठकीला बीएसयुपीचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता प्रकाश कांबळे, शहर अभियंता माधव बाशेट्टी, उपअभियंता विश्वनाथ स्वामी, कार्यकारी अभियंता कोळेकर यांच्यासह अपील संस्थेचे पदाधिकारी, कंत्राटदार उपस्थित होते़ झोननिहाय पूर्ण झालेली घरकुले पुढीलप्रमाणे- झोन नं़ १ - ३३०२, झोन नं़ २ - २९९२, झोन नं ३ - २६९५, झोन नं़ ४ - ८५५, झोन नं़ ५ - ९६२, झोन नं़ ६ - १३१३, ब्रह्मपुरी - १०१़ (प्रतिनिधी)बीएसयुपी योजनेचा आढावा घेण्यासाठी म्हाडाचे प्राधिकरण अधिकारी सतीश गवई यांच्या अध्यक्षतेखाली ६ जून रोजी औरंगाबाद येथे बैठकीचे आयोजन केले आहे़ बैठकीत नांदेड शहरातील घरकुलांची सद्य:स्थिती तसेच खर्च किती झाला, याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली़
३ हजार घरकुलांची कामे अपूर्ण
By admin | Updated: June 5, 2014 00:13 IST