लोकमत न्यूज नेटवर्कबीड : १ जूनपासून सुरू असलेला शेतकरी संप सातव्या दिवशीही सुरूच होता. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी या व इतर मागण्यांसाठी बुधवारी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुुंडण आंदोलन करण्यात आले. माजलगावमध्ये आ.आर.टी.देशमुख यांच्या घराला कुलूप ठोकण्यात आले तर गेवराईमध्ये रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी १ जूनपासून सर्वत्र शेतकरी संप सुरू आहे. मागील सहा दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत. बीडमध्ये शिवसेना महिला आघाडी बुधवारी आक्रमक झाली होती. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळानंतर येथे महिला आघाडीच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आले. यामध्ये महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अॅड.संगीता चव्हाण व स्वाती जाधव यांनी मुंडण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मुंडण झाल्यानंतर केस हे एका बॉक्समध्ये भरून जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले.या आक्रमक आंदोलनानंतर तरी झोपलेल्या सरकारला जाग येईल अशी प्रतिक्रिया महिला आघाडीच्या आंदोलनकर्त्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली.वडवणीत आठवडी बाजार बंदवडवणी येथील बुधवारचा आठवडी बाजार बंद ठेवून शेतकरी, व्यापारी संपात सहभागी झाले. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी संपाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश मस्के, औदुंबर सावंत, प्रा.सोमनाथ बडे, गणेश शिंदे, भारत जगताप, संदिपान खळगे, महादेव अंबुरे, शेतकरी संघटनेचे परमेश्वर पिसोरे, विष्णू वांडरे, दत्ता सावंत, गटनेते शेषेराव जगताप, युवराज गोंडे, संतोष डावकर, संतोष पवार, श्रीराम मुंडे, व्यंकट लंगे, भास्कर उजगरे, धनंजय जाधव, सुग्रीव मुंडे यांची यावेळी उपस्थिती होती.
कर्जमाफीसाठी महिलांचे मुंडण
By admin | Updated: June 8, 2017 00:33 IST