औरंगाबाद : जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने अंधारातून प्रकाशाकडे मोहीम सुरू आहे. शनिवारी शहरातील विविध लहान-मोठ्या पदांवर कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी महिलांनी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे अनेक मार्ग सुचविले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, डॉ. सबा परवीन, डॉ. आएशा हाशमी, डॉ. वर्षा देशमुख, वैशाली कडू, प्रा. भिक्खूनी धम्मदर्शना महाथेरो आदींची प्रमुख उपस्थिती होती. यांसह शहरातील मान्यवर डॉक्टर, अभियंता, पत्रकार, शिक्षिका, प्राध्यापिका आदींची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भट्टाचार्य म्हणाल्या की, महिलांना स्वत:च्या आरोग्याची काळजी नसल्यानेच ॲनिमियासारखे आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात पहावयास मिळत आहेत. वर्षातून एकदा तरी वेळ काढून स्वत:ची संपूर्ण तपासणी महिलांनी करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला, तर डॉ. देशमुख यांनी महिलांना स्वत:चे रक्षण कशा पद्धतीने करता आले पाहिजे, यावर भाष्य केले. डॉ. सबा परवीन यांनी प्रत्येकांनी प्रेमाने राहावे, असा संदेश दिला. यावेळी ॲसिडहल्ला झालेली पीडिता बबीता पाटणी यांनी सांगितले की, जेव्हा माझ्यावर हल्ला झाला होता, तेव्हा मी पूर्णपणे अंधारात गेले होते; मात्र मला मिळालेल्या आई-वडिलांच्या सहकार्याने मी पुन्हा उजेडात आले. त्यामुळे सर्वांनी एकमेकांची साथ दिल्यावर नक्कीच आपण एकदिवस कुठल्याही अंधारावर मात करू शकतो. शाईस्ता कादरी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉ. भट्टाचार्य, डॉ. देशमुख, डॉ. हर्षदा शेलार, आरती तिवारी, छाया थाेरात आदींना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.