औरंगाबाद : जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी शनिवारी सायंकाळी हिसकावून नेले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. गुन्हेशाखा आणि जवाहरनगर पोलिसांनी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत चोरटे पोलिसांच्या हाती लागले होते.
आकाशवाणी परिसरातील संत एकनाथ सोसायटीत राहणाऱ्या भारती गोविंद कुलकर्णी या शनिवारी सायंकाळी उल्कानगरी येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. हा कार्यक्रम आटोपून त्या मैत्रिणीसह पायी रामायणा हॉलकडून जवाहरनगर पोलीस ठाण्याजवळून जात होत्या. पोलीस ठाण्याच्या कॉर्नरवरील पान टपरीजवळ मोपेड दुचाकीवरून दोन चोरटे माणिक हॉस्पिटलसमोरून रास्ता ओलांडून पोलीस ठाण्याजवळ आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने भारती यांच्या गळ्यातील सोन्याचे १७ ग्रॅम मंगळसूत्र हिसका देऊन तोडून घेतले. यानंतर चोरटे सुसाट वेगाने उल्कानगरीच्या दिशेने पळून गेले. यावेळी भारती आणि त्यांच्या सोबतच्या महिलानी आरडाओरड केली; मात्र गजबजलेल्या चौकात कुणाचेही चोरट्यांकडे लक्ष गेले नाही. परिणामी चोरटे घटनास्थळावरून सहीसलामत निसटले. या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणि गुन्हेशाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला.
==========
चौकट
यापूर्वीही मंगळसूत्र चोरीच्या घटनांचा शोध लागेना
यापूर्वी जवाहनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वृद्ध महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाणा करून चोरट्यांनी तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. नवीन वर्षातही मंगळसूत्र चोरटे सुसाट आहेत.
===========
गतवर्षी मंगळसूत्र चोरीच्या २० घटना
गतवर्षी २०२० मध्ये मंगळसूत्र चोरीच्या २० घटना झाल्या होत्या. यापैकी तीन घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले होते, तर २०१९ साली शहरात ४४ महिलांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले होते. यापैकी १४ गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांकडून चोरीचे मंगळसूत्र परत मिळविले होते.