उस्मानाबाद : टँकरवर पाणी भरणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेला ग्रामपंचायत सदस्यानेच मारहाण करीत तिच्या घरी जावून शिवीगाळ केली़ पाण्याच्या नंबरवरून झालेल्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने विषारी द्रव प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला़ महिलेवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ ही घटना शुक्रवारी सकाळी सलगरा (दि़ ता़तुळजापूर) येथे घडली़ तर येडशी येथे बुधवारी सकाळी पाणी भरताना भरलेली घागर छातीवर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाला़रूग्णालयात उपचार घेत असलेल्या पार्वती संगप्पा कुंभार (वय-३० रा़सलगरा दि़) यांनी सांगितले की, गावात पाणीटंचाई असल्याने टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे़ घरातील पुरूष मंडळी शुक्रवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर महादेव गल्ली परिसरात टँकर आले होते़ यावेळी पार्वती कुंभार याही पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या़ त्या पाण्याने भरलेली घागर घरी ठेवून आल्यानंतर क्रमांकाला लावत होत्या़ त्यावेळी तेथे पाणी भरत असलेल्या गावातीलच एका राजकीय पुढाऱ्याने टँकरवरील पाण्याच्या क्रमांकावरून त्यांच्याशी तक्रार करीत शाब्दीक बाचाबाची केली़ त्यावेळी पार्वती कुंभार यांनी त्याला प्रतिकार केला असता पुढारी इसमाने चप्पलने पार्वती कुंभार यांना मारहाण केली़ त्यावेळी तेथे उपस्थित महिलांनी पार्वती यांना घेऊन घर गाठले़ त्यानंतर पाठीमागून आलेल्या त्या इसमासह इतरांनी घरातील मंडळींना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली़ पाण्याच्या क्रमांकावरून सर्वांसमक्ष झालेली मारहाण व घरासमोर येवून केलेली शिवीगाळ, धमकी या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पार्वती कुंभार यांनी विषारी द्रव प्राषण केले़ ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ पार्वती कुंभार यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़येडशी येथील दगडू रामा नागटिळक (वय-३५) हे बुधवारी सकाळी पाणी भरत होते़ पाणी भरत असताना अचानक एक भरलेली घागर त्यांच्या छातीवर पडली़ भरलेली घागर छातीवर पडल्याने दगडू नागटिळक हे जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते़ मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत लोचनाबाई नागटिळक यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, मे महिन्याच्या मध्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्र होत असून, पाण्यामुळे ठिकठिकाणी भांडणे होत आहेत़ (प्रतिनिधी)
पाण्यासाठी महिलेला मारहाण
By admin | Updated: May 23, 2015 00:39 IST