उमरगा : गावे बदलल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. गावांचा सर्वांगिण विकास, अर्थकारण पाण्यावर अवलंबून असते. ज्या गावात जास्त पाणी ते गाव श्रीमंत अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. जमिनीतील पाणीसाठे कायम ठेवण्यासाठी कुपनलिका बंद ठेवाव्या लागणार आहेत. कुपनलिकामुळेच जमिनीतील पाणी साठ्यात घट झाली आहे. गाव हे विकासाचे केंद्र मानून माथ्यापासून पायथ्यापर्यंत पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवा असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.उमरगा तालुक्यातील कवठा सेवाग्राम येथील भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाच कोटी लिटरच्या पहिल्या टप्प्यातील अडीच कोटी वॉटर बँकेची उभारणी केली आहे. या वॉटर बँकेच्या पाण्याचे जलपूजन रविवारी आण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राजस्थान येथील जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा, सिनेअभिनेते रितेश देशमुख, रामकृष्णपंत खरोसेकर, विजयकुमार सोनवणे, पाडोळीचे सरपंच पवार, सरपंच गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते़पुढे बोलताना अण्णा म्हणाले की, गावाचा विकास हा अर्थकारणावर अवलंबून असतो. गावातील अर्थकारण हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती व्यवसायाला पाणी संवर्र्धनाचे नियोजन लाभल्यास गावाचा विकास शक्य आहे. गावातील जलसंवर्धनाची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास कधीच पाणी टंचाई निर्माण होणार नाही. कुपनलिका घेण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून, त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. कूपनलिका बंद करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असून, याबाबत कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यापेक्षा ‘माती आडवा माती जिरवा’ ही संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे. आता केवळ भाषणे करुन वेळ मारुन नेण्याचे दिवस संपले आहेत. दिलेल्या शब्दाला कृतीची जोड द्यावी लागणार आहे. माणसं भौतिक सुखासाठी वेगाने धावपळ करु लागली आहेत. खरे सुख हे दुसऱ्यांना सुखी करण्यात असल्याने इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करा. ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने मरणे पत्करण्यापेक्षा समाजसेवा करताना आलेले मरण खरा आनंद देणारे असते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायकराव पाटील यांनी केले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी खचून न जाता मोठ्या धैर्याने आपल्या व्यथा आमच्यापर्यंत पोहंचवाव्यात. गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन कवी योगीराज माने यांनी केले. तर आभार मलंग गुरुजी यांनी मानले. कार्यक्रमासाठी परिसरातील १०० गावचे सरपंच उपस्थित होते. (वार्ताहर)
गावे बदलल्याशिवाय देशाचा विकास अशक्य
By admin | Updated: March 28, 2016 00:11 IST