वाढवणा (बु.) : आज संपूर्ण जगाला मोबाईलचे वेड लागले आहे आणि मानवाच्या सानिध्यात राहिलेल्या वानराच्या पिलालाही मोबाईलचे वेड लागले असून, त्या वानराने चक्क घरातून एक मोबाईल घेऊन पळ काढला. काही वेळ त्या वानराचा पाठलाग केल्यानंतर ग्रामस्थांना मोबाईल मिळाला आहे. उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु.) येथे गेल्या एक वर्षापासून एक मादी वानर पाण्याच्या शोधात आले आणि ग्रामस्थांच्या प्रेमापोटी वाढवणा (बु.) गावातील रहिवासीच झाले. कालांतराने त्या वानराने मादी पिलाला जन्म दिला. त्या पिल्लानेही ग्रामस्थांना लळा लावला. परिणामी, ग्रामस्थ त्या पिल्लाला दररोज काही तरी खाऊ घालणे, प्यायला पाणी देणे आदी प्रकार करू लागले. ग्रामस्थांनी केलेल्या कृतीचे अनुकरण त्या पिलाकडून होऊ लागले. २ जून रोजी या पिल्लाने गावातील हनुमाननगर येथील सूर्यकांत वाघडोळे यांच्या घरात घुसून उशाला ठेवलेला मोबाईल घेऊन पळ काढला. बघता-बघता पिलाच्या मागे ग्रामस्थ पळू लागले. कोणी त्यास बिस्किटाचे, कोणी आंब्याचे तर कोणी भुईमुगाच्या शेंगाचे आमिष दाखविले. पण; त्याने काहीच न घेता या घरावरून त्या घरावर उड्या मारणे चालू केले. यावेळी दीपक वाघडोळे हा शेजारील भारतबाई बिरादार यांच्या घराच्या छतावर उभा राहिला असता त्या वानराच्या आईने त्याला धक्का दिला. त्याक्षणी दीपक वाघडोळे हे पाच फुटांच्या जिन्यावरून पडले. त्यांना मोठ्या प्रमाणात मुका मार लागला. तेव्हा त्या पिल्लाने रागात झाडावरून मोबाईल फेकून दिला व उपस्थित ग्रामस्थांनी वानराच्या या उच्छादाला कंटाळून एकदाचा सुटकेचा नि:श्वास सोडला. (वार्ताहर)
वानरालाही लागले मोबाईल हाताळणीचे वेड
By admin | Updated: June 3, 2014 00:44 IST