औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील धावडी येथे घडली असून, आरोपीविरुद्ध बलात्काराचा, तर त्याच्या दोन्ही भावांविरुद्ध पीडितेच्या कुटुंबियांना धमकाविल्याचा गुन्हा सोमवारी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.संतोष खरात (रा. धावेडी, ता. जि. जालना), असे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, सात वर्षांपूर्वी पीडितेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यांनीच संतोष खरात याच्याशी पीडितेची ओळख झाली. ओळखीनंतर त्याने पीडितेला एक मोबाईल आणून दिला. नातेवाईक विरोध करतील, असे पीडितेने सांगितल्यानंतरही संतोषने तिला सांभाळ करण्याचे आमिष दाखवून संबंध ठेवले.यामुळे पीडिता गर्भवती राहिली. त्यानंतर तिने संतोषकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, त्याने टाळाटाळ केली. पुढे त्याने तिला मुंबईत नालासोपारा झोपडपट्टीत किरायाने एक खोली घेऊन दिली. दोघेही तेथे जाऊन राहिले. तेथे पीडितेने एका मुलाला जन्म दिला. सध्या तो मुलगा दोन वर्षांचा आहे. मुलाच्या जन्मानंतर पीडितेने संतोषकडे लग्नाची मागणी केली. मात्र, त्याने ही माहिती घरच्यांना सांगितल्यावर त्याच्या दोन्ही भावांनी पीडितेसह तिच्या भावाला आणि आईला धमकावले. तसेच त्यांनी मुंबईला जाऊन संतोष व पीडिता दोघांनाही गावाकडे आणले. औरंगाबादेत आल्यावर त्यांनी पीडितेजवळचा मुलगा घेतला. सध्या तो मुलगा कोठे आहे, हेही तिला माहीत नाही. शेवटी संतोषने लग्नास नकार दिल्यामुळे पीडितेने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. फौजदार ताहेर शेख यांनी शून्याने ही तक्रार नोंदवून घेत गुन्हा तालुका जालना पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर बलात्कार
By admin | Updated: May 11, 2016 00:50 IST