लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आत्मकथन हा साहित्य प्रकार फार संवदेनशील आहे. स्वत:चे आयुष्य पुन्हा एकदा जगून स्वत:ला सोलण्याची प्रकिया अत्यंत क्लिष्ट असते. त्यामध्ये केवळ यश आणि कीर्तीचे वर्णन करून चालत नाही. अपयशाची गाथा सांगणारे आत्मकथनसुद्धा असावे. ते कोणी फारसे लिहिताना दिसत नाही, असा मुद्दा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी उपस्थित केला. डॉ. वासुदेव मुलाटेलिखित ‘झाकोळलेल्या वाटा’ या पुस्तकावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते.महसूल प्रबोधिनी सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. रा.रं. बोराडे होते. या आत्मकथनपर पुस्तकावर भाष्य करताना प्राचार्य डॉ. महेंद्र कदम म्हणाले की, आजच्या तरुणामध्ये कष्ट करण्याची तयारी नाही. झटपट यशस्वी होऊन पैसे कमविण्याची सर्वांची इच्छा आहे. परिस्थितीशी झगडून दोन हात करण्याच्या आपल्यामध्ये दडलेल्या उमेदीला जागृत करण्याची प्रेरणा मुलाटेंच्या लिखाणातून मिळेल.प्रा. जयदेव डोळे म्हणाले की, दु:ख न सांगण्याची भारतीय लोकांची परंपरा आहे. रोजच्या जगण्यातील जनसामान्यांचे अनुभवविश्व टिपून त्याचे संचित पुढील पीढीपर्यंत पोहोचत नाही. हे अनुभव खूप काही शिकवण देऊ शकतात.अध्यक्षीय समारोप करताना बोराडे म्हणाले की, आशयसंपन्न साहित्य केवळ माणसाच्या जगण्याचा इतिहास नसतो. ते त्या काळातील परिस्थिती, व्यवस्था आपल्यासमोर उभी करते. डॉ. मुलाटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माणसाला आपले दु:ख कोणाला तरी सांगायचे असते. ते ऐकण्यासाठी मात्र सहसंवेदनशील माणूस मिळाला पाहिजे. प्रिया धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
अपयशाचे आत्मकथन का नाही?
By admin | Updated: June 27, 2017 01:04 IST