छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकट्या शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) महिन्याला १५ ते २० नवीन बालकर्करुग्ण दाखल होत आहेत. बदलती जीवनशैली, फळे आणि भाज्या पिकवण्यासाठी रासायनिक खतांचा मोठा वापर यासह अनेक कारणांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कॅन्सर दिला जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
दरवर्षी सप्टेंबर हा महिना बालकर्करोग जागरूकता महिना म्हणून जगभरात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत बालकर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. रक्ताचा कर्करोग तसेच अन्य तत्सम रोगांमध्ये ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ करावे लागते. यासाठी खासगी रुग्णालयांत १५ ते २० लाखांचा खर्च येताे.
टाटा मेमोरियल हाॅस्पिटलचे शैक्षणिक अधिष्ठाता डाॅ. कैलास शर्मा, घाटीचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय कर्करोग रुग्णालयात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बालकांमध्ये कोणता कर्करोग अधिक?बालकांमध्ये रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर लिव्हर आणि हाडांच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. मेंदू, किडनी, डोळ्यातदेखील कॅन्सर आढळतो. अनुवांशिकता, पेशींमध्ये होणारे जनुकीय बदल, जंतूनाशके, कीटकनाशके, रसायने यांचा वाढलेला वापर, काही जन्मजात आजार ही मुलांमधील कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत.
कर्करोगावर मात शक्यजगभरात कर्करोगाचे प्रमाण दुर्दैवाने वाढत आहे. लवकर निदान झाल्यास कॅन्सर रुग्ण कर्करोगावर मात करून सर्वसामान्यांप्रमाणे जगू शकताे.- डाॅ. तुषार इधाटे, बाल रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञ.
लवकर निदान महत्त्वपूर्णप्रत्येक मुलाला कर्करोगाच्या पलीकडे एक भविष्य हवे आहे. लवकर निदान, वेळेवर उपचार आणि समुदायाचा पाठिंबा, यामुळे रुग्णाचे जगणे बदलू शकते. बालकर्करोग जागरूकता महिन्यानिमित्त आपण केवळ या आजाराशीच नव्हे, तर त्याभोवती असलेल्या निराशेशीही लढण्याचा संकल्प करूया.- डाॅ. अनुप तोष्णीवाल, कर्करोगतज्ज्ञ
सर्व उपचार उपलब्ध, ‘बोन मॅरो’साठी प्रयत्नशीलमहिन्याला साधारणपणे १५ ते २० नवीन बालरुग्ण येतात. बालकर्करुग्णांमध्ये रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. आता ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- डाॅ. अदिती लिंगायत, बाल कर्करोग विभाग प्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.