---
राजकारणात कोण कोणाच्या जिवावर कसा मोठा होईल, हे सांगता येत नाही, तसेच कोण कोणाला कधी व कशी मात देईल, याचाही अंदाज लावता येत नाही. आता हेच पाहा ना. साहेबांच्या जिवावर विजेचे सुरक्षा कंत्राट मिळवून गब्बर झालेल्या नेत्याने युवा सेनेत वर्चस्व प्रस्थापित केले. पुढे साहेबांशी काडीमोड घेत व त्यांना धोबीपछाड देत प्रतिष्ठेची पदेही मिळवली. सहा महिन्यांपूर्वीच या युवा नेत्याने साहेबांच्या चिरंजीवांचा संघटनेच्या पदाधिकारीपदावरून काटा काढला. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा नुकताच विस्तार करण्यात आला. त्यातही त्याने आमदार साहेबांच्या पुत्रास अस्मान दाखविले. साहेबांच्या चिरंजीवांच्या राजकारणाचा ‘जाळ’ काढताना त्यांनी जो कामे करील तो पदे घेईल, अशी शेखीही मिरवली; पण हे करताना आपल्या पदराखालील काही चिल्यापिल्यांना पदाधिकारी करणे काही टाळले नाही. आता साहेब या पदाधिकाऱ्यांची कार्यक्षमता कशी जोखणार, अशी कुजबुज सुरू असतानाच, साहेबांच्या मुलांनी सपशेल शरणागती पत्करल्याचे दिसते. युवा पदाधिकारी नाही होऊ दिले तर जाऊ द्या, मी नगरसेवक होईन, असे म्हणत त्यांनी ‘बागेतून’ बाहेर पडून वॉर्डातून कामाला सुरुवात केली. युवा संघटनेत स्पर्धा करू न शकणाऱ्या युवराजांचा कसलेल्या प्रौढांत कसा टिकाव लागणार? या चर्चेने आता जोर धरला आहे.