लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्याचीच नव्हे, तर अर्ध्या जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदी सध्या मरणयातना भोगत आहे. हिंगोली शहरानजीकच या नदीचे पात्र कचरा व गाळामुळे उथळ होत चालले आहे. या नदीवर मायनर बॅरेजेस होणार असले तरीही ते होईपर्यंत असेच बेहाल राहण्याची चिन्हे आहेत.हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली व कळमनुरी या तीन तालुक्यांतून कयाधू वाहते. या नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पावसाळ्यात आले तसे वाहून जाते. या नदीवर एक-दोन कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. मात्र डोंगरगाव पूल येथे तेवढे पाणी साठलेले दिसते. इतर बंधाºयांचा फारसा उपयोग पाणी साठविण्यास किंवा शेतीसाठीही होत नाही. हिंगोलीनजीक तर ही नदी म्हणजे कोरडे पात्रच असते. हिंगोली शहरातील सांडपाण्यामुळे मात्र जणू नाल्यासारखी ती वाहती असल्याचे चित्र दिसून येते. मात्र शहरानजीकच्या भागात या नदीचे पात्र उथळ होत चालले आहे. कधीकाळी या भागातून आम्ही गाढवावरून वाळू वाहतूक करायचे, असे जुने जाणकार अनेक जण सांगतात. सध्या मात्र येथे माती व प्लास्टिकयुक्त कचरा साठल्याने पात्रात बेट तयार झाले आहेत. त्यावर हिरवळ दाटत आहे. त्यामुळे नदीला पूर आला तरीही हा गाळ वाहून जात नसल्याचे चित्र आहे. यावर काही प्रमाणात गुरांची गुजराण होत असली तरीही त्यामुळे नदी मात्र मृतप्राय झाल्यात जमा झाली आहे. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी अनुशेषाचा मुद्दा निकाली लावल्यात जमा आहे. मात्र एकदा मिनी बॅरेजेस झाले तरीही हिंगोली शहरानजीकच्या घाट विकासाचा कार्यक्रमही हाती घ्यावा लागणार आहे. लोकसहभागातून तरी हा गाळ काढणे गरजेचे आहे.
कयाधूचे पात्र उथळ होत चाललेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:42 IST