नायगाव बाजार ; तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने दोन टप्प्यात ३ कोटी ३६ लाखांचा कृती आराखडा मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठविला आहे.२०१५ मध्ये ३६५ मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत ३९ टक्केच झाला. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तालुक्यातील सिंचन, पाझर तलाव, नदी-नाले, बोअर, विहिरीतील जलसाठा वाढला नाही. त्यातच मानार भरला नसल्याने रबीसाठी पाणी आले नाही. त्यामुळे अनेक गावे पाणीटंचाईच्या कचाट्यात सापडली. अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली तर काही ठिकाणी अधिग्रहण करुन त्यावर मात करण्याचा प्रयत्न होतो आहे. एप्रिल, मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई आताच जाणवू लागली आहे. पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी आ. वसंतराव चव्हाण, जि.प. व पं.स. सदस्य, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा, सरपंच यांची बैठक घेऊन सर्व बाबींचा विचार करुन कृती आराखडा तयार करण्यात आला. तो दोन टप्प्यात असून मंजुरीसाठी जिल्हा पातळीवर तो पाठवला. त्यात जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी २ कोटी २४ लाख ४६ हजारांचा आराखडा आहे. त्यात २१ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यावर २७ लाख खर्च होणार आहेत. २ गावांत पुरक नळयोजना ६ लाख, नळयोजना विशेष दुरुस्ती १५ गावांत खर्च ३२ लाख, ५ गावांत विहिरीतील गाळ काढणे ४ लाख, ३४ गावांत विंधन विहिर विशेष दुरुस्ती ७ लाख ६२ हजार, ८१ गावांत बोअर व विहीर अधिग्रहण करणे ६० लाख ८४ हजार, ९१ गावांत नवीन विंधन विहीर घेणे ८७ लाख असा २ कोटी २४ लाख ४६ हजार खर्च येणार आहे.
३ कोटी ३६ लाखांचा पाणी आराखडा
By admin | Updated: January 16, 2016 23:52 IST