लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही बँकेचे कर्ज नसलेल्या नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार एक हजार शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी प्रस्ताव दाखल केले. परंतु, अजूनही एकाही प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी बँकेमध्ये चकरा मारीत आहेत. पाथरी येथे एक महिन्यापूर्वी सहाय्यक निबंधक, लीड बँक आणि स्थानिक बँक अधिकारी यांचा कर्ज वाटपा संदर्भात बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा घेतला होता. यामध्ये कोणत्याही बँकेचे पीक कर्ज नाही, अशा शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटपाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील हादगाव, वडी, रामपुरी, ढालेगाव, खेर्डा, रेणाखळी, वरखेड, बानेगाव, मंजरथ, जवळा झुटा या दहा गावांतील शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र ग्रामीण बँकेने प्रस्ताव मागविले होते. या दहा गावांतील एक हजार शेतकऱ्यांनी विविध कागदपत्रे, नोड्युजसह प्रस्ताव सादर केले होते. मात्र कर्ज वाटपाबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेला वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने कर्ज मान्यतेची प्रक्रिया रखडली आहे. एकाही शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप करण्यात आले नाही.
एक हजार प्रस्तावांना प्रतीक्षा
By admin | Updated: June 25, 2017 23:23 IST