लातूर : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांसह उद्योगांनाही सोसाव्या लागल्या. अल्प पर्जन्यमानामुळे तुरीसह सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. परिणामी, जिल्ह्यातील डाळ उद्योगाची गती मंदावली असून, तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या मिल केवळ एका शिफ्टमध्ये सुरू आहेत. या डाळ मिलला नवीन येणाऱ्या तुरीची प्रतीक्षा आहे. देशासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळ उपलब्ध करून देणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. जिल्ह्यात सुमारे शंभर डाळ मिल असून, एकट्या लातुरात ७० ते ७५ डाळ मिलची संख्या आहे. या डाळ मिलमध्ये तीन शिफ्टमध्ये डाळ प्रक्रिया सुरू होती. गतवर्षी अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. याचा परिणाम डाळ उद्योगावर झाला. मार्च २०१६ पासून तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या डाळ मिल केवळ एकाच शिफ्टमध्ये चालू लागल्या. सध्या तुरीची तुरळक आवक असल्याने एका शिफ्टमध्येच प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पीकपाणी चांगले असल्याने तुरीचा उतारा चांगला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, तुरीची आवक सरासरीपेक्षा २५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
लातूरच्या डाळ मिलला तुरीची प्रतीक्षा
By admin | Updated: November 3, 2016 01:35 IST