औरंगाबाद : गेल्या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून अद्यापही निधी मिळालेला नाही. जवळपास ६५ लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा जि. प. समाजकल्याण विभागाला आहे. यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी दिली. प्राथमिक शाळांमधील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने इयत्ता पाचवी ते सातवीमधील मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. त्याच धर्तीवर आठवी ते दहावीमधील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ वर्षांपासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार इयत्ता पाचवी ते सातवीमधील सर्व मागासवर्गीय मुलींसाठी प्रती वर्ष ६०० रुपये, तर आठवी ते दहावीच्या सर्व मागासवर्गीय मुलींना प्रती वर्ष १००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने शिष्यवृत्तीचा कालावधी धरला जातो. गेल्या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलींना शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली; पण विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलींच्या शिष्यवृत्तीचा जवळपास ६५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून अद्यापही मिळालेला नाही. यासंदर्भात जि. प. समाजकल्याण विभागाने शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. अशातच यंदा आठवी ते दहावीच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित करण्याचा अधिकार जि. प. समाजकल्याण विभागाला प्रदान करण्यात आला आहे. आतापर्यंत या मुलींना राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती.
शिष्यवृत्तीच्या ६५ लाख निधीची प्रतीक्षा
By admin | Updated: July 15, 2016 01:07 IST