लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पावसाने दडी मारल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर जलाशयांची पाणीपातळी कमी होत असून जूनच्या प्रारंभी झालेल्या पावसाने कासवगतीने वाढणारे प्रकल्प आता वेगाने कमी होत आहेत़ विष्णूपुरी जलाशयातील साठा १८ टक्क्यांहून १६ टक्क्यावर आला आहे़ गत दोन आठवड्यांत २ टक्क्यांनी साठा कमी झाला आहे़ मृग नक्षत्रात समाधानकारक बरसलेल्या पावसाने नंतर पाठ फिरविली़ तब्बल २५ दिवसांची ओढ दिलेल्या पावसामुळे आता पाणीटंचाईचे संकट भेडसावत आहे़ पाण्याअभावी करपून जाणाऱ्या पिकांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ११ जुलै २०१६ मध्ये विष्णूपुरी जलाशयात ४० टक्के साठा उपलब्ध होता़ तर १२ जुलै २०१७ मध्ये या जलाशयात १३़ २२ दलघमी साठा उपलब्ध आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा विष्णूपुरी जलाशयाची स्थिती गंभीर झाली आहे़ यंदा मे अखेर प्रकल्पात केवळ २ टक्के साठा उपलब्ध होता़ पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेचा आधार होता़ मात्र विष्णूपुरी जलाशय कोरडे पडल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ २२ जून रोजी जलाशयात १४़४७ दलघमी म्हणजे १७ टक्के साठा होता़ त्यानंतर ३० जून रोजी १४़७९ दलघमी म्हणजे १८़ ३१ टक्के पाणी उपलब्ध झाले होते़ त्यानंतर विष्णूपुरी जलाशयातील पाणी पातळी पावसाअभावी जैसे थी होती़ आता हळूहळू या साठ्यात घट होत आहे़ शहराला काही भागात एक दिवस तर काही भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने जलाशयातून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे़ पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला असला तरी विष्णूपुरी जलाशयातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ‘जैसे थे’ आहे़ शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे़ विष्णूपुरी जलाशयातील साठा वाढण्यासाठी परभणी, गंगाखेड या भागातील नदी क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे़
विष्णूपुरीच्या पाणीसाठ्यात घट
By admin | Updated: July 13, 2017 00:27 IST