औरंगाबाद : खाजगी सावकाराच्या त्रासाला वैतागून सातारा परिसरातील एका तरुणाने फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी सावकार व त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी सातारा पोलीस ठाण्यात गुरुवारी ठिय्या मांडला. गुन्हा नोंदविल्यानंतरच नातेवाईकांनी तरुणाचे शव ताब्यात घेतले.सुनील विनायक शेजूळ (२५), रा. चंद्रशेखरनगर, सातारा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, सुनील हा शिवाजीनगर परिसरात मोबाईल शॉपी चालवीत होता. व्यवसायासाठी त्याचे शिवाजीनगरातील खाजगी सावकार आशिष जवूळकर याच्याकडून व्याजाने मोठी रक्कम घेतली होती. या रकमेपैकी त्याने साडेसात लाख रुपयांची परतफेडही केली होती. मात्र, ‘तुझ्याकडे आणखी बरेच पैसे शिल्लक आहेत, ते परत कर’ असा आरोपी आशिषने गेल्या काही दिवसांपासून सुनीलच्या मागे तगादा लावला होता. सुनील या सावकाराच्या पाशात पुरता अडकलेला होता. सावकाराच्या तगाद्यामुळे तो हैराण झाला होता. सुनील आणि त्याच्या वडिलांना सावकार फोन करून धमकावत होता.घरी येऊन केली मारहाणकाल दुपारी सुनील आपल्या घरी बसलेला होता. अडीच वाजेच्या सुमारास सावकार आशिष जवूळकर हा कल्याण आणि सोमनाथ नावाच्या आपल्या दोन साथीदारांसह घरी आला. व्याजाचे पैसे का देत नाही, असे म्हणत त्याने सुनीलला घरातून बाहेर बोलावून घेऊन शिवीगाळ, दमदाटी केली. मारहाण केली आणि ‘औकात नसेल तर स्वत:ला संपवून घे’ असे म्हणत आरोपी निघून गेले. वरच्या मजल्यावर घेतली फाशीसावकाराचा त्रास आणि त्यातच त्याने केलेल्या अपमानाने सुनील खचून गेला होता. सावकार धमकावून निघून गेल्यानंतर ‘मी वरच्या खोलीत जाऊन झोपतो’ असे म्हणत सुनील घराच्या वरच्या खोलीत गेला. सायंकाळी पाच वाजले तरी तो खाली आला नाही म्हणून घरचे त्याला झोपेतून उठविण्यासाठी गेले. तेव्हा त्याने खोलीत छताला साडी बांधून फाशी घेतली असल्याचे उघडकीस आले. तातडीने फासावरून उतरवून त्याला घाटीत आणण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्रेत ताब्यात घेण्यास नकारगुरुवारी सकाळी घाटीत सुनीलचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत तेथेच ठेवून सरळ सातारा पोलीस ठाणे गाठले. सुनीलच्या आत्महत्येस सावकार व त्याचे साथीदारच कारणीभूत आहेत. त्यांच्या त्रासाला वैतागूनच त्याने आत्महत्या केली. जोपर्यंत या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवीत नाहीत, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी नातेवाईकांची समजूत घातली. तातडीने सुनीलचा भाऊ अनिल याची फिर्याद घेऊन आरोपी सावकार आशिष जवूळकर, त्याचे साथीदार कल्याण आणि सोमनाथ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर दुपारी नातेवाईकांनी सुनीलचे शव ताब्यात घेतले. सुनीलने सावकाराकडून नेमके किती पैसे व्याजाने घेतले होते, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी सांगितले.
सावकारी जाचाला कंटाळून त्रस्त तरुणाची आत्महत्या
By admin | Updated: September 12, 2014 00:30 IST