नांदेड : वासुदेव समाजसेवा संघाच्या वतीने मारवाडी धर्मशाळेत पहिला राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. उद्घाटन महापौर शैलजा स्वामी यांनी केले. माजी सभापती किशोर स्वामी, प्रकाश मुथा, आनंद चव्हाण, प्रा. संतोष देवराये, प्रकाश कांबळे यांची उपस्थिती होती.शैलजा स्वामी म्हणाल्या, वासुदेव समाजाने प्राचीन रुढी, परंपरा, अंधश्रद्धेला बाजूला ठेवून आधुनिकतेची कास धरुन परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावे. सर्वच समाजांमध्ये उपवधू-वर यांना सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी परिचय मेळाव्याची नितांत गरज आहे. तरुण पिढीने रुपावर भाळून न जाता आचार, विचार, संस्कृतीमूल्ये याचा विचार करुन जोडीदार निवडावा. वासुदेव समाजाची ओळख भटका समाज असा असला तरी, प्रत्येक समाज पहाटेच्या प्रहरी जागण्यास हा समाजजागृती करणारा आहे. वासुदेव समाजासाठी मनपाच्या वतीने जागा देण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी सूचना केली आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेवू असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रा. संतोष देवराये म्हणाले, वासुदेव समाजाने आता बुसरलेल्या विचारांची कात टाकून शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होवून प्रगती करावी. तरुण पिढीने विज्ञानवादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून यशाची उंच भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगावे. मेळाव्यात ४१ वधू व ५९ वरांनी परिचय करुन दिला. सूत्रसंचालन उत्तम वाकोडे व प्रकाश डोईजड यांनी केले. जिल्हाध्यक्ष रामकिशन डोईजड यांनी आभार मानले. मेळाव्याला एक हजार वासुदेवबांधव उपस्थित होते. /(प्रतिनिधी)
वासुदेव समाजाचा मेळावा
By admin | Updated: December 31, 2015 13:35 IST