औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी बारूदगरनाला येथे ९ वर्षीय मुलगा कुत्रा चावल्याने मरण पावला होता. या घटनेनंतर शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पॅटर्नची पाहणी मंगळवारी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. अधिकारी आयुक्तांकडे अहवाल सादर करणार असून, त्यानंतर धोरण ठरविले जाणार आहे.शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या ४० ते ४५ हजार असेल, असे मनपाला वाटत आहे. ही संख्या दुपटीने असावी, असे मत तज्ज्ञांचे आहे. महापालिकेने कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदी करण्यासाठी गतवर्षी पुणे येथील ब्लू क्रॉस या संस्थेची नियुक्ती केली आहे. दीड महिन्यापूर्वी एका मुलाचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने नवी मुंबईच्या धर्तीवर कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी उपायुक्त वसंत निकम, उद्यान अधीक्षक तथा प्रभारी मुख्य पशुसंवर्धन अधिकारी विजय पाटील, पशुधन पर्यवेक्षक शेख शाहेद यांनी नवी मुंबई महापालिकेला भेट देऊन माहिती घेतली. आयुक्त आल्यानंतर अधिकारी अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर धोरण ठरविण्यात येणार आहे.तब्बल पाच कोटींचा खर्चनवी मुंबई महापालिकेने कुत्र्यांवर नसबंदी करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. शिवाय महापालिकेतर्फे तब्बल चार डॉक्टर, अत्यावश्यक कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. दरवर्षी पाच कोटी रुपये महापालिका नसबंदीवर खर्च करीत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मुंबईतील कुत्र्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. सध्या काही भागात कुत्रे शोधूनही सापडत नसल्याचे चित्र असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.
मोकाट कुत्र्यांवर नसबंदी; मुंबई पॅटर्नची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:05 IST