औरंगाबाद : घाटीतील अनुभवी निवासी वैद्यकीय अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभागात कायमस्वरूपी रुजू झाले आहेत. तेव्हापासून नुकतेच एमबीबीएस उत्तीर्ण झालेले १९ नवखे डॉक्टर अपघात विभागात वैद्यकीय अधिकारी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. शासकीय कामकाजासंदर्भात कोणतेही प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले नाही. परिणामी अनेक समस्यांचा सामना घाटी प्रशासनाला करावा लागत आहे. घाटीत पूर्वी तेथील वैद्यकीय अधीक्षक ते निवासी वैद्यकीय अधिकारी, अपघात विभाग वैद्यकीय अधिकारी पदावर सार्वजनिक आरोग्य विभागातून प्रतिनियुक्तीवर आलेले डॉक्टर कार्यरत असत. २००९ मध्ये शासनाने घाटीत कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रद्द केली. त्यांच्यासोबत अस्थायी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले चार वैद्यकीय अधिकारी नोव्हेंबर २०१४ पर्यंत घाटीत कार्यरत होते. तेही सार्वजनिक आरोग्य विभागात रुजू झाले. तेव्हापासून नुकतेच एमबीबीएस पूर्ण केलेले १० वैद्यकीय अधिकारी घाटीच्या अपघात विभागात, ३ डॉक्टर विभागीय रक्तपेढीत आणि शहागंजमधील दुर्गाप्रसाद आरोग्य धाम येथे एक वैद्यकीय अधिकारी, तर आरएमओ कार्यालयात ३ जण, मनोचिकित्सा विभाग आणि बाह्यरुग्ण विभागात प्रत्येकी एक जण आहे.३ पदे रिक्त आहेत. अपघात विभागात दाखल होणाऱ्या घात, अपघातामधील रुग्णांची एमएलसी नोंदवावी लागते. एमएलसी नोंदविणाऱ्या डॉक्टरांना उपचारासंबंधीचे प्रमाणपत्र पोलिसांना द्यावे लागते.बऱ्याचदा साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहावे लागते. मात्र, नवख्या डॉक्टरांना याचे ज्ञान नाही. त्यामुळे बऱ्याचदा गरज नसताना एमएलसी करण्यात येते. शिवाय हे वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करीत असतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळताच ते राजीनामा देऊन जातात. शिवाय एक वर्ष शासकीय सेवा करणे त्यांना बंधनकारक असल्याने ही मंडळी येथे कार्यरत राहतात. मात्र त्यानंतर त्यांची इच्छा असली तरी त्यांना पदमुक्त करावे, असे स्पष्ट आदेश वैद्यकीय शिक्षण संचालकांनी दिलेले आहेत.
घाटीचा कारभार नवख्या डॉक्टरांवर
By admin | Updated: February 3, 2015 01:00 IST