औरंगाबादेत लस दाखल झाल्यानंतर या लसी सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच आरोग्य उपसंचालक कार्यालयातील तळमजल्यात कोल्ड रुमचे युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. त्याचे कामही बुधवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. डॉ. स्वप्निल लाळे, सहायक संचालक डॉ. प्रदीप मुरंबीकर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अमोल गिते यांनी कोल्ड रूमच्या कामाची पाहणी केली. पुण्यातून देशभरात कोरोना लसी पाठविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये बुधवारी सकाळपर्यंत औरंगाबादेत लस दाखल होण्याचा अंदाज आहे.
पुण्याहून आधी या लसी रात्री पोहोचतील, अशी माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार लसीचा साठा ठेवण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते; परंतु त्यानंतर लस सकाळपर्यंत दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार या लसींचा साठा ठेवण्यासंदर्भात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आली. लस कुठपर्यंत आली आहे, कधी येईल, याचाच आढावा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत घेणे सुरू होते.