लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी आरोग्य विभाग व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत नियमित लसीकरण कार्यक्रम राबविला जातो. विविध लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाने शंभर टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. परिणामी बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु होण्यापूर्वी जिल्ह्यात जन्मदर २८़५ इतका होता. आजघडीला १४ टक्क्यांवर आला आहे. जन्मापासून एक वर्षाच्या कालावधीत होणारे अर्भक मृत्यूचे प्रमाण दर हजार जन्मामागे ४२ इतके होते. ते २०१६ मध्ये २२़२ वर आले आहे. भारतामध्ये अतिनवजात व नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण दर हजारी २२ व नवजात अर्भक दर २८ इतका होता. मात्र नांदेड जिल्ह्यात या लक्षणीय घट झाल्याचे बघायला मिळते. जिल्ह्यात अतिनवजात अर्भक मृत्यू प्रमाण हे २१़१ तर नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण हे १६़४ इतक्यावर आले आहे.अतिनवजात व नवजात अर्भकांचा मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहीम हे महत्वाचा भाग असतो. अर्भक, बाल व उपजत मृत्यूचे अन्वेषण वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत होत असते. यासाठी नियमितपणे लसीकरण कार्यक्रम राबविले जातात़ यात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी मिशन इंद्रधनुष्य, पल्स पोलिओ अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडी तपासणी करून जे कुपोषित बालके आहेत, त्यांच्यावर उपचार करण्यात आले.बालकांची तपासणी व उपचाराच्या माध्यमातून अर्भक व बालमृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. २०१४-१५ या वर्षी ९९़१ टक्के लसीकरण झाले होते. २०१५-१६ या वर्षात ९७ टक्के तर २०१६-१७ या वर्षात १०१ टक्के लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला़ गत वर्षभरात ३६ सत्रे राबविण्यात आल्याची माहिती डॉ़ बालाजी शिंदे यांनी दिली़
बालमृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहीम
By admin | Updated: June 11, 2017 00:29 IST