अनुराग पोवळे नांदेडआगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला असताना प्रशासनाची निवडणूक तयारी सुरू झाली आहे़ विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे उत्तर प्रदेशातून आणले जाणार आहेत़ यातील पहिल्या टप्प्यात १ हजार मतदानयंत्रे प्राप्त झाली आहेत़ विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीसाठी २००६ पूर्वीचे मतदानयंत्रे न वापरण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले आहेत़ जिल्ह्यात ९ विधानसभा मतदार -संघ आहेत़ या मतदारसंघात निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाचीही जोरदार तयारी सुरू आहे़ मतदार याद्या अंतिम करण्याचेही काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात विधानसभेसाठी २४ लाख ८७ हजार २६२ मतदार मतदान करणार आहेत़ लोकसभा निवडणुकीपेक्षा जिल्ह्यात मतदारांची संख्या ५१ हजार ७४४ ने वाढली आहे़ जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी २ हजार ७३६ मतदान केंद्र होते़ विधानसभेत या मतदान केंद्रात काही प्रमाणात वाढ होणार आहे़ ही वाढ अपेक्षित धरून जिल्हा निवडणूक विभागाने मतदान यंत्रांची मागणी केली होती़ त्यानुसार नांदेड जिल्ह्याला उत्तर प्रदेशातून मतदानयंत्रे प्राप्त झाली आहेत़ पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील हापूर येथून १ हजार कन्ट्रोल युनिट आणि १ हजार २०० बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत़ हे मतदानयंत्रे नांदेड तालुक्यातील खुपसरवाडी येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत़ आणखी दोन टप्प्यात २ हजार ४०० मतदानयंत्रे जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातीलच बदायून येथून ३०० कन्ट्रोल युनिट आणि ७०० बॅलेट युनिट आणि तिसऱ्या टप्प्यात बदायून येथूनच २ हजार १०० कन्ट्रोल युनिट आणि २ हजार ८०० बॅलेट युनिट प्राप्त होणार आहेत़ जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास ३ हजार इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे लागण्याची शक्यता आहे़ यात बदलही होवू शकतो असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे़ या प्राप्त मतदानयंत्राची फर्स्ट लेव्हल चेकिंग अर्थात प्राथमिक तपासणी ही ११ ते २० आॅगस्टदरम्यान इसीआय इंजिनिअर्सच्या माध्यमातून केली जाणार आहे़ मशीनच्या रॅन्डमायझेननंतर विधानसभानिहाय या मशीन वाटप करण्यात येतील अशी माहिती निवडणूक विभागाचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली़ निवडणूक विभागाने दिलेल्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी २००६ पूर्वीचे मतदान यंत्र वापरू नयेत, असे आदेश दिले आहेत़ परिणामी जिल्ह्यातील २००६ पूर्वीचे मतदानयंत्रे जिल्हा निवडणूक विभागाने हैदराबादला परत पाठविले आहेत़जिल्ह्यात ५१ हजार मतदार वाढलेजिल्ह्यात ९ जून ते ३० जून या कालावधीत मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमात ५१ हजार ७४४ मतदार वाढले आहेत़ त्यात सर्वाधिक १३ हजार ९९० मतदार हे नांदेड उत्तर मतदारसंघात आहेत़ नांदेड दक्षिणमध्ये ७ हजार ३७१, किनवट - ३ हजार ७३, हदगाव ५ हजार, भोकर - ४ हजार ४४४, लोहा - ४ हजार १९५, नायगाव - ४ हजार १७८, देगलूर ५ हजार २१० आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात ४ हजार २८२ मतदार वाढले आहेत़ ४ सर्वाधिक एकूण मतदार हे नांदेड उत्तर मतदारसंघातच आहेत़ या मतदारसंघात ३ लाख २८ हजार ७६१ एकूण मतदार आहेत़ तर नांदेड दक्षिण मध्ये २ लाख ९९ हजार ५०८, किनवट - २ लाख ४१ हजार ८९१, हदगाव - २ लाख ६३ हजार ९७५, भोकर - २ लाख ५९ हजार ९७७, लोहा - २ लाख ५६ हजार १७९, नायगाव - २ लाख ७६ हजार ९३८, देगलूर - २ लाख ८७ हजार ८५७ आणि मुखेड मतदारसंघात २ लाख ७२ हजार १७६ एकूण मतदार आहेत़
नांदेडात उत्तर प्रदेशची मतदानयंत्रे
By admin | Updated: August 7, 2014 01:29 IST