औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ व १९ फेबुवारी रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. १६ हजार हेक्टवरील रबी पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे दिसत असून, मदत मागणीसाठी पुढच्या आठवड्यात शासनाकडे अंतिम अहवाल पाठविण्यात येणार आहे. फळबागा आणि बागायती क्षेत्रफळाचा नुकसानीत समावेश आहे.
गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे २६ लाख हेक्टवरील खरीप हंगामाचे नुकसान झाले होते. २३५० कोटींची मदत विभागातील शेतकऱ्यांना करण्यात आली असून, शेवटचे अनुदान जानेवारी २०२१मध्ये देण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील ५ तालुक्यांत १३४ गावे, जालन्यातील ३ तालुक्यांतील ४२ गावे, बीडमधील ३ तालुक्यातील ६७ गावे, परभणीत एका तालुक्यातील ३८ गावे आणि उस्मानाबादेत ४ तालुक्यातील ५१ गावे अशा एकूण १५ तालुक्यांतील ३३२ गावांचा समावेश आहे. पाच जिल्ह्यांत ४५ हजार ५३५.६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात जिरायती १४ हजार ७० हेक्टर, बागायती ३० हजार ५१० हेक्टर आणि ९५५ हेक्टरातील फळबागांच्या नुकसानीचा समावेश आहे. १६ हजार २५९.६३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले की, अंतिम नुकसानीचे पंचनाम्याचे अहवाल येत आहेत. शुक्रवारी दिवसभर अहवाल येत होते. पूर्ण नुकसानीचे अहवाल आल्यानंतर पुढच्या आठवड्यात शासनाकडे मदत मागणीसाठी अहवाल पाठविण्यात येईल.