भोकरदन: २१ मे रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे जुई नदीला पूर आला. या पूरामुळे भोकरदन शहरासह २५ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या दानापूर येथील जुई धरणात अर्धा फूट पाणीसाठा वाढला आहे. उन्हाळ्याच्या काळात जुई नदीला पूर येणे व धरणाच्या पाणी पातळीत वाढ होणे ही घटना पहिल्यांदाच घडली आहे.
तालुक्यात पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहरभोकरदन तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे गेल्या आठवड्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला असून, सहा जनावरेही दगावली आहेत. अनेक झाडे उन्मळून पडली असून विजेच्या ताराही तुटल्या आहेत.
जुई नदीच्या उगमस्थानी मुसळधार पावसाची नोंद२० व २१ मे रोजी रात्री सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव, गोळेगाव तसेच भोकरदन तालुक्यातील अनवा, वाकडी, जानेफळ गायकवाड, कुकडी, कोदा, कठोरा बाजार, सुरंगळी या गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जुई नदी दोन्ही किनाऱ्यांवरून वाहत पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे धरणात अर्धा फूट पाण्याची भर पडली आहे.
उन्हाळ्यात पूरस्थितीमे महिन्यात नदीला पूर येण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती दानापूर येथील शेख बशीर यांनी दिली. या पाणीसाठ्यामुळे भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.