छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पीएच.डी. प्रवेशासाठी पीएच.डी. प्रवेश परीक्षा रद्द करून त्याजागी ‘नेट’ परीक्षेची अट ठेवली आहे. दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर नेट परीक्षा घेण्यात येते. त्याचवेळी राज्यस्तरावर राज्य पात्रता परीक्षा (सेट) घेण्यात येते. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास पीएच.डी.ला प्रवेश मिळणार की नाही, याविषयी यूजीसीच्या नव्या नियमात कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.
नेट परीक्षा दिल्यानंतर त्यात मिळालेल्या गुणानुसार ज्युनिअर रिसर्च फेलोशिप व सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरविले जाते. आता त्याच निकालात पीएच.डी. प्रवेशाचाही स्वतंत्र निकाल जाहीर केला जाणार आहे. याची अंमलबजावणी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
विद्यापीठाच्या पातळीवर पीएच.डी. प्रवेशासाठी पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) घेण्यात येत होती. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्राध्यापक होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नेट) निकाल तीन पातळीवर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील एका पातळीवरील पर्सेंटाइल जाहीर करून त्याद्वारे पीएच.डी.ला देशपातळीवर प्रवेश देण्याचा नियम २७ मार्च रोजी जाहीर केला आहे.
दरम्यान, ‘नेट’च्या धर्तीवर राज्य पातळीवर ‘सेट’ परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी प्राध्यापकपदासाठी पात्र ठरतात. मात्र, आता हे विद्यार्थी पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरणार की नाही, याविषयी स्पष्टता नसल्याने संभ्रम आहे.
खासगी विद्यापीठांची मक्तेदारी संपणारखासगी विद्यापीठांमध्ये पेटद्वारे पीएच.डी.ला प्रवेश देऊन मोठ्या प्रमाणात पीएच.डी.चे बाजारीकरण मागील काही वर्षांपासून सुरू झाले हाेते. आता यूजीसीच्या नव्या नियमामुळे खासगी विद्यापीठांना नेट उत्तीर्णतेच्या आधारावरच प्रवेश द्यावे लागणार असल्यामुळे त्यांना विद्यार्थी मिळणेही मुश्कील होणार आहे. त्यातच त्यांची मक्तेदारीही संपुष्टात येणार आहे.