पैठण : पैठण रस्त्यावर अपघाताची मालिका सुरुच असल्याने निष्पाप बळी जात आहेत. काल शुक्रवारीच गेवराई तांड्याजवळ टँकरने रिक्षामधील ९ जणांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा दोन तरुणांना जीव गमवावा लागला. शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पैठण - शेवगाव रस्त्यावरील जिल्हा खुले कारागृहाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले.गोविंद बलभीम रासने (३०) व नामदेव जालिंदर घुगे (३०, दोघे रा. घोटन ता. शेवगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव आहे. शनिवारी सकाळी हे दोघे तरुण दुचाकीने (क्र. एमएच -१६ -बीके-४१३४) पैठण शहरात लग्नासाठी आले होते. लग्न आटोपून ते गावी परतत असताना हा अपघात झाला. पैठणचे पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोघा तरुणांना पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत दोघे तरुण मरण पावले होते. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील २ तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 1:07 AM