औरंगाबाद, दि. ६ : पुंडलिकनगर, गणेशनगर, हनुमाननगर, गजानननगर आदी वसाहतीमधील घरासमोर उभ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांमधून पेट्रोल चोरणा-या टोळीला पुंडलिकनगर पोलिसांनी आज दुपारी बेड्या ठोकल्या. या टोळीकडून बुलेट, चोरलेले चार लिटर पेट्रोल आणि चोरी करण्यासाठी वापरल्या जाणा-या प्लास्टीक नळ्या जप्त करण्यात आल्या.
ऋषिकेश संतोष पालोदकर(१८,रा. गल्ली नंबर ७,पुंडलिकनगर) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालक(अल्पवयीन मुलगा) यांचा यात आरोपीत समावेश आहे. याआरोपींचा तिसरा साथीदार पसार असून त्याचा शोध सुरू आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, पुंडलिकनगर, गारखेडा, गजानननगर, हनुमाननगर,गणेशनगर आदी वसाहतीमधील नागरीकांच्या वाहनातून गेल्या काही दिवसापासून पेट्रोल चोरीच्या घटना घडल्या होत्या. तक्रारदार राजेंद्र होणाजी इंगोले(रा.गणेशनगर) यांच्यासह शेजारील नागरीकांच्या मोटारसायकल, कार आदी वाहनातून २१ ते २९ सप्टेंबर या कालावधीत तब्बल २८ लिटर पेट्रोल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तेव्हा एका घरावरील सीसीटीव्हीमध्ये बुलेटस्वार चोरटे कारमधून पेट्रोलचोरी करीत असल्याचे कैद झाले. हे सीसीटिव्ही फुटेज नागरीकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याआधारे आणि खब-याच्या आधारे पोलिसांनी आरोपी पालोदकर आणि एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केली असता त्यांनी अन्य एकासह पेट्रोलचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट, चार लिटर पेट्रोल आणि पेट्रोलचोरी करण्यासाठी वापरलेल्या नळ्या, कटर पोलिसांना काढून दिल्या. ही कारवाई आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहुल श्रीरामे,सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र पवार,सहायक पोलीस उपनिरीक्षक बोटके, बाळाराम चौरे, संतोष पारधे,, जालिंदर माटे, विलास डोईफोडे, रणजीत सुलाने यांनी केली.
मौजमजा करण्यासाठी चोरायचे पेट्रोलआरोपी हे मौजमजा करण्यासाठी आणि विशेषत: नवरात्रोत्सवात कर्णपुरा यात्रेत रोज बुलेटने दर्शनासाठी जात. कर्णपुरा यात्रेत जाण्यासाठी त्यांच्या बुलेटला लागणारे पेट्रोल ते चोरी करून मिळवित. शिवाय बºयाचदा ते पेट्रोलची विक्रीही करीत,अशी माहिती समोर आली. या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. सर्व आरोपी हे विद्यार्थी आहे. कॉलेजला जाण्या-येण्यासाठी ते पेट्रोल चोरी करीत होते.