लातूर:लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे़ गेल्या दोन महिन्यात ११ खुनाच्या घटना घडल्या आहेत़ आॅक्टोबर महिन्यात चार तर नोव्हेंबर महिन्यात ७ खून झाले असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही आणखी दोन खून झाले असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ११ पैकी ३ प्रकरणांत आरोपीही डिटेक्ट झाले नाहीत.लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढ होत आहे़ चोरी, घरफोडी, अवैध दारु विक्री या बरोबरच खुनाच्या घटनेतही वाढ होत आहे़ आॅक्टोबर महिन्यामध्ये घरगुती कारणावरुन औसा तालुक्यातील उंबडगा येथील पूनम विशाल थोरात या महिलेचा खून झाला़ अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरुन शिवाजी अदिनाथ नाडागुडे याचा सोनखेड येथे खून झाला़ औसा तालुक्यातील किल्लारी जवळील कुमठा येथे शेतीच्या वादावरुन विनायक जगताप यांचा खून झाला़ रेणापूर येथील लखन चक्रे या व्यक्तीचा पैसे देणे-घेणेच्या कारणावरुन खून झाला़ आॅक्टोबर महिन्यात चार खुनाच्या घटना घडल्या आहेत. आरोपीचा तपास लागण्यास विलंब, परिणामी न्यायालयात खटला दाखल होण्यासही विलंब. त्यामुळे धाक कमी होतो आहे. परिणामी, अशा गंभीर घटना लातूर जिल्ह्यात घडत आहेत.नोव्हेंबर महिन्यामध्ये अहमदपूरमध्ये नवरा-बायकोच्या भांडणावरुन बापानेच नेहा लादेन ऊर्फ हुजू शेख हिचा खून केला़ लातूर शहरातही अनैतिक संबंधावरून अशोक राऊत यांचा खून झाला़ लातूर तालुक्यातील गातेगाव येथे पुजारी नावाच्या तरुणाचा खून झाला आहे. अद्याप त्याचे मारेकरी पोलिसांना सापडले नाहीत. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील कांचन गणेशराव गच्चे या महिलेचा खून झाला़ शिरुर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ येथे जनक हजारे या व्यक्तीचा खून झाला़ देवणी तालुक्यातील रावणगाव येथील बस्वराज आडेप्पा वलूरे या व्यक्तीचा खून झाला आहे. चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथे कल्पना कमलाकर शिरसाठ या महिलेचा खून झाला असून, महिनाभरात ७ खुनाच्या घटना घडल्या आहेत़ गेल्या २ महिन्यात हा आकडा ११ वर गेला आहे. चोऱ्या तसेच दुचाकीची चोरी आणि आता खुनाच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)४खुनांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढच होत आहे़ लातूर तालुक्यातील १२ नंबर पाटी येथे महेश माळी या व्यक्तीचा ३० हजारांच्या उधारीच्या कारणावरुन विकास गवळी या चिकुर्डा येथील मित्रानेच खून केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच तसेच काटगाव परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. दुसऱ्या दिवशी याबाबत खुनाचा गुन्हा गातेगाव पोलिसांत दाखल झाला. दोन महिन्यांत ११ खुनाच्या घटना घडल्या असल्या तरी याबाबत अद्याप एकाही प्रकरणात न्यायालयात चार्जशीट दाखल झाली नाही. चार्जशीट दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा तपास कालावधी असल्याने चार्जशीट दाखल करण्यास पोलिस प्रशासनाकडून विलंब होत आहे.
दोन महिन्यात ११ खून !
By admin | Updated: December 15, 2014 00:44 IST